वनविभागाची शोधमोहीम, भीती कायम
प्रतिनिधी/ बेळगाव
जाधवनगरमध्ये एका गवंडी कामगारावर शुक्रवारी हल्ला चढविलेल्या बिबटय़ाचा शोध दुसऱया दिवशीही सुरू होता. दरम्यान बिबटय़ाला पकडण्यासाठी परिसरात सापळा आणि टॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र अद्याप वनखात्याच्या हाताला काहीच लागले नाही. त्यामुळे बिबटय़ा जाधवनगरमध्येच आहे की दुसरीकडे गेला? याबाबत भीती कायम आहे.
जाधवनगर परिसरात गवंडी काम करणाऱया सिद्राय निलजकर यांच्यावर शुक्रवारी बिबटय़ाने हल्ला केला. त्यात ते किरकोळ जखमी झाले असले तरी शहरात बिबटय़ा कोठून आला? हा प्रश्न साऱया शहरवासियांना पडला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी बिबटय़ाने हल्ला केल्याची बातमी मिळताच वनखाते, पोलीस व अग्निशमन दलाचे जवान परिसरात तळ ठोकून होते. मात्र बिबटय़ा दुसऱया दिवशीच्या शोधमोहिमेअखेर हाताला लागला नव्हता. त्यामुळे बिबटय़ा आता शहरातील अन्य दुसऱया कुठल्या वस्तीत गेला आहे का? याबाबत मात्र भीतीचे वातावरण आहे.
वनखात्याने जाधवनगर परिसर पिंजून काढून शोधमोहीम सुरू ठेवली आहे. दरम्यान परिसरात सापळा रचून भक्ष्य म्हणून कुत्री बांधण्यात आली आहेत. शिवाय बिबटय़ाच्या पावलांचे ठसे किंवा इतर कोणती बाब हाताला लागते का? यासाठी शोध सुरू आहे. जाधवनगरशेजारी असलेल्या रेसकोर्स परिसरात वनक्षेत्र अधिक असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ हा बिबटय़ा आला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जाधवनगर येथील नाला झुडुपांनी व्यापला आहे. तसेच चिखल आणि दलदल अधिक असल्याने शोधमोहीमेत अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान मनपाला दुसऱया दिवशी जाग आली असून परिसरात असलेल्या नाल्यातील झुडुपे हटविण्याचे काम जेसीबीच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र हा परिसर अधिक करून झुडुपांनी व्यापला गेल्याने बिबटय़ाच्या शोधात अडथळा निर्माण होत आहे.
अलीकडे शहरात बिबटय़ाची दहशत
दोन वर्षांपूर्वी कुदेमनी येथे एका काजूच्या बागेत बिबटय़ाचे दर्शन झाले होते. तर गतवषी रेसकोर्स परिसरात बिबटय़ा सदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. मात्र अखेर ते रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी हिंडाल्को परिसरात बिबटय़ाचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत शहरात बिबटय़ाची दहशत वाढत आहे. त्यामुळे वनखात्याने याबाबत जातीने लक्ष घालून बिबटय़ाचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
रेसकोर्स व जाधवनगर परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. त्यामुळे या परिसरात ससे, मोर, रानमांजरे आदींच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय शहरात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्री हे बिबटय़ाचे प्रमुख खाद्य असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ बिबटय़ा शहरात आला असावा, असा अंदाजही वनखात्याने वर्तविला आहे. अलीकडे वनक्षेत्रातदेखील वाढ झाल्याने बिबटय़ांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान उसाच्या क्षेत्रात बिबटय़ाचा अधिवास अधिक प्रमाणात आहे. मागील आठवडय़ात येडूरवाडी (ता. चिकोडी) येथे बिबटय़ाने दहशत माजविली होती. त्यामुळे जिल्हय़ात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे दिसत आहे.
प्रतिक्रिया
राकेश अर्जुनवाड (आरएफओ, वनखाते)
बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी परिसरात सापळा आणि टॅप कॅमेरा बसविला आहे. शिवाय बिबटय़ाच्या हालचालींवर कॅमेऱयांची नजर असणार आहे. शिवाय या परिसरातील नागरिकांनी रात्रीच्यावेळी बाहेर पडू नये, तसेच सतर्क रहावे, त्याचबरोबर बिबटय़ा निदर्शनास येताच तातडीने वनखात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.









