दोन दिवसानंतर सर्वच शाळा शुक्रवारपासुन पुर्ववत सुरू झाल्या. त्यामुळे शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजला.
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पुरबाधीत गावातील शाळांना मंगळवार दि.25 पासुन पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मनपा प्रशासनाने बुधवारी अचानक सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा गोंधळ उडाला होता. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरूवारी दिलेल्या निर्देशानुसार आजपासुन सर्व शाळा पुर्ववत सुरू करण्यात आल्या.

गुरूवारी पालकमंत्री केसरकर यांनी जिल्ह्याचा दौरा करून पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा जोर कमी झाल्याने व अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविल्याने संभाव्य पुराचा धोका टळल्यामुळे सर्वच शाळा शुक्रवारपासुन पुर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सर्व शाळांचे वर्ग पुर्ववत भरले. शाळा महाविद्यालयात मुलांच्या किलबिलाटाने परिसर गजबजला. तसेच पुढे पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास मुख्याध्यापकांनी त्यांच्या पातळीवर शाळा बंद ठेवण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने पुरग्रस्त भागातील 27 गावातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका प्रशासनाने बुधवारी अचानक शहरातील सर्वच माध्यमांच्या एकुण 298 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच उशिरा सुचना मिळाल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना शाळेत येऊन परत फिरावे लागले होते.









