मनपाच्या मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई विद्यालयाची स्थिती
मैदानावर ठेकेदाराचा कब्जा: वाहनांचे पार्किंग
रात्रीच्यावेळी ओपन बार : मुलांवर मैदान शोधण्याची वेळ
कोल्हापूर/विनोद सावंत
अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या मिळकतीमध्येच अतिक्रमण वाढत आहे. यामध्ये मनपाच्या शाळेच्या मैदानाचाही समावेश आहे. मंगळवार पेठ, कलकल ग्रुप येथील महाराणी ताराबाई विद्यालयाच्या मैदानही त्यापैकी एक आहे. येथे चक्क मैदान खडीचा अड्डा झाला आहे. याच ठिकाणी परिसरातील चारचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. परिणामी परिसरातील मुलांना मैदानापासून वंचित राहावे लागत आहे.
सर्वसामान्य कुटूंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी शाळांची उभारणी केली. खासगी शाळांच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे महापालिकेच्या 58 शाळांपैकी 8 ते 10 शाळा सोडल्या तर उर्वरीत शाळांची पटसंख्या कमी आहे. सद्यस्थिती महापालिकेच्या काही शाळा बंद अवस्थेत आहेत. येथील शाळेचा परिसर आणि मैदानाचा वापर शिक्षण आणि खेळापेक्षा इतर कामांसाठीच होत आहे. बंद वर्गामध्ये महापालिकेने स्वत:ची कार्यालये सुरू केली आहेत. खोलखंडोबा येथील महापालिकेच्या शाळेमध्ये उद्यान, महापालिका कर्मचारी दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. मैदानात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हीच स्थिती मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई विद्यालयाची झाली आहे. येथील शाळेची इमारत वापरात नसल्याने महापालिकेने बी वॉर्ड आरोग्य विभाग सुरू केला आहे. याच शाळेच्या मैदानावर महापालिकेचे रस्ते करणाऱ्या ठेकेदारांनी खडी आणून टाकली आहे. परिणामी परिसरातील मुलांना खेळासाठी मैदानाचा शोध घ्यावा लागत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर
महाराणी ताराबाई विद्यालय 1946 मध्ये सुरू झाले आहे. मंगळवार पेठेतील सर्वसामान्य कुटूंबातील मुलांनी येथून शिक्षण घेतले आहे. तसेच परिसरातील मुलांसाठी येथे एकमेव मैदान आहे. इमारतीचे जुने दगडी बांधकाम असून आजही सुस्थिती आहे. पटसंख्या कमी झाल्याने 75 वर्षांपूर्वीची शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे आणखी अतिक्रमण वाढण्यापूर्वी मनपा प्रशासनाने या शाळेचे आणि मैदानचे अस्तित्व टिकवणे आवश्यक आहे.
रात्रीस ‘खेळ’ चाले
शाळेची इमारत बंद असल्याने व मैदानात खडी टाकल्याने रात्रीची वेळी हा परिसर ओपन बार बनलेला असतो. धुम्रपान करणाऱ्यांचीही येथे वर्दळ असते. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी मनपा प्रशासनाने हा परिसर तत्काळ वापरात आणणे गरजेचे आहे.
टर्फ मैदानाला मुहूर्त मिळेना
युती सरकार राज्यात सत्तेवर असताना येथील मैदानावर अद्ययावत तंत्रज्ञानाचे टर्फ मैदान करण्याचे प्रस्तावित होते. परंतू सत्तांतर झाल्यानंतर टर्फ मैदानाचा विषय बाजूला पडला आहे. येथे टर्फ मैदान झाले असते तर परिसर वापरात आला असता. येथील अवैध प्रकारांना नक्कीच अळा बसला असता.
महाराणी ताराबाई विद्यालयात बाल संकुलमधील 125 मुले शिक्षण घेत होती. त्यांनी परिसरातील खासगी शाळेत प्रवेश घेतल्याने पटसंख्या कमी झाली आहे. ही शाळा बंद ठेवली जाणार नसून येथे तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करून नव्याने येथे विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घेतला जाणार आहे. यासाठी परिसरात फिरती करून पालकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. शाळा पूर्वपदावर सुरू झाल्यास मैदान खुले ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील.
शंकर यादव, प्रशासनाधिकारी,
महापालिका प्राथमिक शिक्षण समिती









