आरोग्य-शिक्षण स्थायी समिती बैठक : चौकशीसाठी समिती नेमण्यावर चर्चा
बेळगाव : महानगरपालिकेच्या माध्यमातून लाभार्थींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. मात्र मागील आरोग्य व शिक्षण स्थायी समितीने एकाच परिसरातील लाभार्थींना योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. याची सखोल चौकशी करण्याबाबत समिती नेमण्याची चर्चा बुधवारी झालेल्या आरोग्य व स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. पुढील बैठकीत योग्य ती माहिती घेऊन याची चौकशी करण्याचे ठरविण्यात आले आहे. महानगरपालिकेतील आरोग्य व शिक्षण स्थायी समितीची बैठक बुधवारी झाली. या पहिल्याच बैठकीमध्ये मागील स्थायी समितीने योजनांचा दुरुपयोग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे यांनी उपायुक्त उदयकुमार तळवार यांना याबाबत विचारले असता, मागील स्थायी समितीने ज्या लाभार्थींची यादी तयार केली आहे, त्यांनाच आम्ही लॅपटॉप व इतर वस्तूंचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हाला याबाबत चौकशी करायची असेल तर तुम्ही समिती नेमू शकता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेला निधी तसाच पडून आहे. त्याचे योग्य ते वितरण झाले पाहिजे, असे उपायुक्त तळवार यांनी यावेळी सांगितले. 2021 पासून आतापर्यंत अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेला 24.10 टक्के हा निधी मोठ्या प्रमाणात आहे. त्या निधीचे वितरण होणे गरजेचे आहे. जर वेळेत वितरण झाले नाही तर आम्हा सर्वांनाच याबाबत सरकारला व इतर आयोगांना उत्तर द्यावे लागणार आहे. तेव्हा निधीचे वेळीच वाटप होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या स्थायी समितींच्या बैठकीमध्ये झालेल्या ठराव व चर्चांबाबत तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का? असा प्रश्न स्थायी समितीच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी विचारला. त्यावर संपूर्ण बैठकीचे रेकॉर्डिंग करणे अशक्य असल्याचे कौन्सिल विभागाचे सेक्रेटरी एम. महेश यांनी सांगितले. आम्ही झालेल्या ठरावांबाबत लेखी नोंद ठेवत असतो. मात्र रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओग्राफी करत नसल्याचे त्यांनी सांगितले.
एपीएमसी येथील महानगरपालिकेच्या इमारतीमधील तळघरामध्ये वाहने पार्किंग करावीत, अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सदाशिवनगर येथील वाहने त्याठिकाणीच पार्किंग केल्यास त्याचा फायदा होणार आहे. सध्या ही इमारत तयार असून त्याचा वापर होणेही महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, गटनेते गिरीश धोंगडी, विरोधी गटनेते मुजम्मील डोणी, नगरसेविका अस्मिता पाटील यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.









