काही भागात अंधारात, बंद पथदिपांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष
बेळगाव : शहरातील विविध रस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी पथदीप बसविण्यात आले आहेत. अलिकडे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तसेच महापालिकेच्या निधी अंतर्गत प्रत्येक रस्त्यावर डेकोरेटीव पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र शहर आणि उपनगरातील निम्मे पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेक महत्वाच्या रस्त्यांवर अंधार पसरला आहे. या समस्येचे निवारण करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. पथदीपांच्या देखभालीसाठी महापालिकेकडून कोट्यावधी निधी खर्ची घातला जातो. देखभाल आणि नवीन पथदीप व अन्य कामकाजासाठी वर्षाला पाच कोटींहून अधिक निधी खर्च केला जातो. या व्यतिरिक्त स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आणि महापालिकेच्या निधीमधून कोट्यावधी खर्च करून नवीन पथदीप बसविण्यात आले होते. मात्र निम्मे पथदीप बंद पडल्याने दुरूस्ती करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्येक महिन्याला कंत्राटदाराला सूचना करण्यात येते पण याची दखल घेतली जात नाही.क्लब रोड, कॉलेजरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, काँग्रेस रोड, खानापूर रोड आणि बॅ. नाथ पै चौक ते येळ्ळूर क्रॉस पर्यंतचे पथदीप बंद आहेत. अशा प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरील पथदीप नादुरूस्त असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदिपांच्या दुरूस्तीसाठी महापालिकेकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली आहे. पण महापालिकेकडुन याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याचा फटका शहरवासीयांना बसत आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देवून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
पथदीप रात्री बंद आणि दिवसा सुरू
शहरातील काही हायमास्ट दिवसादेखील सुरू ठेवण्यात येत आहेत. तर बहुतांश पथदीपांना टायमर बसविण्यात आला आहे. पण त्या वेळेत पथदीप सुरू होण्याऐवजी हे पथदीप रात्री बंद आणि दिवसा सुरू रहात असल्याचे निदर्शनास आले आहे. समादेवी गल्ली परिसरातील पथदीपाचे झ्अप्;ध्प्अ नेहमीच कोलमडले असल्याचे आढळून आले आहे. तसेच लक्ष्मीटेकडी येथील हायमास्ट रात्रंदिवस सुरू आहेत पण विविध चौकात बसविण्यात आलेले हायमास्ट कायमस्वरूपी बंद आहेत. हे हायमास्ट आता शोभेचे खांब बनले आहेत.









