चिपळूण : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी चाकरमानी मोठ्यासंख्येने गावच्या दिशेने येत आल्याने येथील मध्यवर्ती बसस्थानक चाकरमान्यांच्या गर्दीने फुलून गेले आहे. असे असताना ग्रामीण भागातील बहुतांशी एसटी फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे बसेस उशिराने धावत असून चाकरमानी प्रवाशांतून नाराजीचा
सूर उमटू लागला आहे. इतकेच नव्हे तर ऐन गर्दीच्या हंगामातही एस.टी. फेऱ्या अभावी फलाट रिकामे दिसून येत आहे.
लक्ष लागून राहिलेला गणेशोत्सव बुधवारी जल्लोषात साजरा होत असल्याने या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील चाकरमानी शुक्रवारपासून आपल्या गावी मोठ्यासंख्येने येत आहेत. बाप्पाच्या स्वागतावेळी गणेशभक्तांच्या
उत्साहाला सर्वाधिक बहर येत असल्याचे आजवरचे एक समिकरण आहे. गावच्या दिशेने येणाऱ्या चाकरमानी प्रवाशांसाठी मुंबई, पुण्यातील आगाराकडून जादा बसगाड्यांचे विशेष नियोजन केले असून याचा निश्चित फायदा या प्रवाशांना होत आहे. यासह चिपळूण आगाराच्या जादा फेऱ्यादेखील चाकरमानी प्रवाशांना आणण्यासाठी बुधवारपर्यंत रवाना होणार आहेत.
सोमवारी चाकरमान्यांच्या आगमनामुळे चिपळूण आगार काहीसे फुलून गेले होते. मात्र एकीकडे चाकरमानी प्रवासी गावच्या दिशेने जाण्यास निघाले असताना दुसरीकडे बहुतांशी ग्रामीण फेऱ्या अर्ध्या तासाच्या फरकाने उशिराने धावत होत्या. यासह नियोजित मार्गावरील फेऱ्या आगारात येण्यास विलंब लागत असल्याने ऐन गर्दीच्या हंगामात बसस्थानकात बसेस दिसून येत नसल्याने ते रिकामे दिसून येत आहे.









