चाकूसोबत पोलिसांच्या ताब्यात
एका निर्जीव बाहुलीला अटक करण्यात आल्याचे वाचल्यावर अजब वाटेल. परंतु ही घटना मेक्सिकोत घडली आहे. येथे पोलिसांनी एका बाहुलीला अटक केली आहे. या बाहुलीचा मालक लोकांना घाबरविण्यासाठी तिचा वापर करत होता. या बाहुलीचे नाव चकी असून अधिकारी याला ‘राक्षसी बाहुली’ मानतात. या बाहुलीच्या हातात खरा चाकू दिला जात होता. पोलिसांनी बाहुलीसोबत तिचा वापर करणाऱ्या संबंधित मालकालाही पकडले आहे. त्यांच्यावर उत्तर मेक्सिकोच्या काहुइला प्रांतातील मोनक्लोवामध्ये सार्वजनिक व्यवस्था बिघडविण्याचा आणि लोकांना धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कार्लोस नावाचा व्यक्ती शहराच्या मुख्य चौकात मद्यधुंद अवस्थेत होता, त्याने बाहुलीद्वारे लोकांना घाबरविण्यास सुरुवात केली होती. हा एक गुन्हा असून याचमुळे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मोनक्लोवा पोलीस विभागाचे संचालक राउल अल्कोसर यांनी दिली आहे.

कार्लौस आणि त्याच्याकडील बाहुलीच्या हातांमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याचे एक छायचित्र देखील समोर आले आहे. तसेच आरोपीप्रमाणे बाहुलीचे छायाचित्र काढण्यात आले आहे. ही बाहुली 1988 मध्ये प्रदर्शित भयपट ‘चाइल्ड्स प्ले’च्या काळापासून चर्चेत आहे. तर ज्या पोलीस अधिकाऱ्याने स्थानिक प्रसारमाध्यमांकडून वृत्तांकन केले जात असताना बाहुलीच्या हातात बेड्या ठोकल्या त्याला फटकारण्यात आले आहे. काही पत्रकार थट्टेच्या स्वरुपात बाहुलीला बेड्या ठोका असे सांगत होते, या सुचनेचे पालन करत पोलीस अधिकाऱ्याने हा प्रकार केला आहे. संबंधित अधिकाऱ्याने नियम गंभीरपणे पाळणे आवश्यक होते असे अल्कोसर यांनी म्हटले आहे.









