महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सफाई कामगार दिन साजरा : आरोग्य तपासणी शिबिराचाही घेतला लाभ

प्रतिनिधी /बेळगाव
दररोज कचऱयाची उचल करण्यासाठी धावपळ करणाऱया स्वच्छता कर्मचाऱयांनी सफाई कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेऊन खेळांचा आनंद लुटला. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर शुक्रवारी सफाई कामगार दिन मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला. पोलीस परेड मैदानावर स्वच्छता कामगारांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. महापालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
बेळगाव शहराच्या स्वच्छता व सुशोभिकरणासाठी स्वच्छता कामगारांचे कार्य कौतुकास्पद आहे. मेहनती नागरी सेवकांसाठी शासनाने 23 सप्टेंबर हा पौर कामगार दिन म्हणून घोषित केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सफाई कामगार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्यावतीने कर्मचाऱयांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले हेते. यावेळी स्वच्छता कर्मचाऱयांसाठी कब्बडी, थ्रो बॉल, रस्सीखेच, शंभर मीटर धावणे अशा स्पर्धा व महिलांसाठी लिंबू चमचा, संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
यावेळी उपस्थितांचे स्वागत महापालिकेचे पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांनी केले. दैनंदिन कामाची जबाबदारी असते, त्यामुळे विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व स्वच्छता कामगारांनी आनंद लुटला. यावेळी महापालिकेचे कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मीडिया आणि प्रिंट मीडिया पत्रकारांमध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यासाठी तसेच स्वच्छता कामगारांना शुभेच्छा देण्यासाठी कुमार गंधर्व सभागृहात विशेष सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी विजेत्यांना महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्वच्छता कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी करण्यासाठी रामनगर आरोग्य केंद्राच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी, डोळय़ांची तपासणी तसेच अन्य आजारांबाबत तपासणी करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी स्वच्छता कामगारांनी आरोग्य तपासणी शिबिराचाही लाभ घेतला. यावेळी मैदानावर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो स्वच्छता कर्मचाऱयांच्या माध्यमातून साकारण्यात आला.
आजचा दिवस स्वच्छता कामगारांसाठी खास आहे. त्यांच्यासाठी अनेक उपक्रम आखले आहेत. आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे डॉ. रुदेश घाळी यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक व मनपा कर्मचारी सहभागी झाले होते.









