माणसाने आपल्या हव्यासापोटी नैसर्गिक व्यवस्थेची अतोनात हानी केली आहे. स्वतःचा स्वार्थ आणि भौतिक सुखे यासाठी निसर्गाची नाजूक जीवनसाखळी तोडण्यासही तो मागेपुढे पहात नाही. असे केल्याने एक ना एक दिवस आपलेच जीवन धोक्मयात येणार आहे, याचेही त्याला भान नसते. विशेषतः निसर्गाने लक्षावधी वर्षे जपलेली जंगले तोडताना माणूस सारेच भान गमावून बसलेला असतो. तथापि, काही वृक्षप्रेमी याला अपवाद आहेत.
आसाम राज्यातील माजुली गावचे ग्रामस्थ जाधव पायेंग यांनी वृक्षतोड झाल्यामुळे रेताड आणि नापीक बनलेल्या जमिनीचा एकहाती कायापालट करून एक आदर्श घालून दिला आहे. गेली 37 वर्षे ते आपल्या निवासस्थानाच्या जवळ असणाऱया रेताड जमिनीमध्ये प्रतिदिन एक वृक्षाचे रोपटे लावत आहेत. केवळ रोपटे लावून त्यांचे काम भागत नाही. तर आतापर्यंत लावलेली जवळ सर्व रोपटी त्यांनी डोळय़ात तेल घालून जगविलेली आणि वाढविलेली आहेत. 37 वर्षांमध्ये प्रतिदिन एक याप्रमाणे त्यांनी जवळपास 16 हजार वृक्षांचे अशाप्रकारे रोपण आणि संवर्धन केलेले आहे. त्यामुळे आता एकेकाळी उजाड असणारी ही जमीन हिरव्या पट्टय़ात रूपांतरित झाली आहे. वृक्ष लावतानाही त्यांनी स्थानिक जमिनीत नैसर्गिकरीत्या उगवणाऱया रोपटय़ांचीच निवड केली आहे. आता 16 ते 20 हजार वृक्षांचे ही एक छोटेखानी वनभूमी तयार झाली असून तिचा ताबा वृक्षांच्या आधाराने राहणाऱया प्राणी आणि पक्ष्यांनी घेतला आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱया अनेक पक्षी प्रजातींचे पुनरुज्जीवन त्यांच्या या अथक परिश्रमामुळे झाले आहे. 50 वर्षांपूर्वी गावात दिसणारे पण नंतरच्या काळात अदृश झालेले पक्षी, फुलपाखरे व इतर प्रजाती आता पुन्हा दृष्टीला पडू लागले आहेत. एकप्रकारे मानवाने बिघडविलेले निसर्गचक्र त्यांनी पुन्हा निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल आता सरकारदरबारीही घेण्यात आली आहे. हे काम करत असताना त्यांनी कोणाचेही साहाय्य घेतलेले नाही, हे विशेष आहे. केवळ नित्यनेमाने एखादे व्रत साकारल्याप्रमाणे प्रतिदिन एक झाड लावून त्यांनी ही निसर्गक्रांती घडविली आहे. प्रारंभी त्यांनी हे काम अत्यंत गुप्तपणे केले होते. 2007 मध्ये एका फोटो जर्नालिस्टकडून त्यांच्या या कामाचा परिचय सर्वांना झाला. आज ते या भागात वनसंरक्षक म्हणून कौतुकाने ओळखले जातात. त्यांच्यावर एक माहितीपटही बनला आहे.









