अध्याय अठ्ठाविसावा
देहाभिमानामुळे माणसाचे कसे नुकसान होते हे भगवंत उद्धवाला समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, देहाभिमानामुळे मिथ्या असलेला संसार खरा वाटू लागतो. ह्या देहाभिमानाची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतात आणि तो शेतात वाढलेल्या हरळीसारखा फोफावलेला असतो. त्यापासून मुक्तता मिळवणं अति कठीण असलं तरी जर निर्धाराने ठरवलं तर ते अशक्य नाही. अहंकाराचे निर्दालन कसे करायचे ते मी तुला सविस्तर सांगतो. मी आणि देव वेगळे आहेत असे जीवात्मा समजू लागला की, त्याला काया, वाचा, मनाने द्वैताचे स्फुरण होते. त्याचे निर्मुलन करणे आवश्यक आहे. जीवात्म्याला वाटू लागलेल्या भेदामुळेच त्याला संसार खरा वाटू लागतो. देहाभिमानामुळेच कर्माकर्मांच्या आटाटी होऊन जन्ममरणांचे कोटी कोटी फेरे घेणारा जीव दु:ख संकटे भोगत असतो. अशा ह्या दु:खदायक देहाभिमानाची समूळ ओळख करून घ्यावी. देहाभिमानामुळे आत्तापर्यंत मी किती भ्रमल्यासारखा वागत होतो हे लक्षात घेऊन पश्चात्ताप झाल्यावर त्याचे निर्दालन करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सद्गुरुना शरण जाऊन ज्ञानखड्गाची प्राप्ती करून घ्यावी. त्यासाठी सद्गुरूंच्या उपदेशाचे मन:पूर्वक ग्रहण करून मनन करावे. ज्याप्रमाणे सहाणेवर घासून शस्त्राला धारदार बनवतात त्याप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेशाचे तंतोतत पालन करून प्रखर असे ज्ञानखड्ग प्राप्त करून घ्यावे. संसार वृक्षाचा कंद देहाभिमानामुळे पोसला जातो, त्याचा अद्वैतसाधनेने समूळ छेद करावा. देहाभिमान समूळ छेदून टाकल्यावर उरलेले आयुष्य सज्जन लोक निराभिमानाने आणि निष्ठापूर्वक व्यतीत करतात. त्यामुळे त्यांना इच्छा, निंदा, द्वेष, तृष्णा बिलकुल त्रास देत नाहीत. सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानखड्ग प्राप्त झाल्याने त्यांनी त्यांचे मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केलेली असते. त्यामुळे त्याच्या इच्छेचा व तृष्णेचा संपूर्ण निरास झालेला असतो. उद्धवाने भगवंतानी सांगितलेले लक्षपूर्वक ऐकले. सद्गुरुकृपा, ज्ञानखड्ग, निराभिमान, निष्ठा इत्यादि गोष्टी त्याने ऐकल्या खऱ्या पण भगवंतानी ह्या सगळ्याचा सविस्तर उलगडा केला तर बरं होईल असे त्याला वाटू लागले. ज्ञानखड्ग हे संसाराचे समूळ निर्दालन कसे करते? हे ज्ञानखड्ग कसे मिळवायचे? त्यासाठी साधन कोणते? हे साधन केल्यावर त्याचे फल कोणते आणि कसे मिळते अशी एक प्रश्नांची मालिकाच त्याच्या मनामध्ये तयार झाली. हे सगळे सगळे नीट समजले आणि मी त्यानुसार वागलो तर माझाही देहाभिमान नष्ट होईल असे त्याला वाटले. उद्धव आणि भगवंत ह्या जरी दिसायला दोन व्यक्ती असल्या तरी त्यांची मने पूर्णपणे एकरूप झालेली असल्याने उद्धवच्या मनातल्या शंका भगवंताना आपोआपच उमगल्या आणि त्याच्या मनातल्या सर्व शंका निवारण करण्याच्या दृष्टीने ते बोलू लागले. ते म्हणाले, उद्धवा सर्वसाधारणपणे माणसे जीवनास आवश्यक असलेले शिक्षण घेतात आणि त्याला ते ज्ञान म्हणतात. पण आत्मोद्धारासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याबाबत माहिती घेणे हे खरे ज्ञान ज्याला आत्मज्ञान किंवा चोख ज्ञान असेही म्हणतात. त्यामध्ये नित्यानित्यविवेकाचा समावेश होतो. नित्य म्हणजे कायम टिकणारी वस्तू तर अनित्य म्हणजे नाश पावणाऱ्या वस्तू होत. तेव्हा नित्य वस्तू कोणत्या आणि अनित्य वस्तू कोणत्या हे आत्मोद्धार होण्याच्या दृष्टीने समजून घेणे आवश्यक आहे. नित्य वस्तू म्हणजे जी वस्तू काल होती, आज आहे आणि उद्याही असेल अशी वस्तू, थोडक्यात ती वस्तू कधीच नष्ट न होणारी हवी आणि अशी वस्तू एकच आहे ते म्हणजे आत्मतत्व म्हणजेच निर्गुण, निराकार परमेश्वर होय. इतर सर्व नजरेसमोर दिसणाऱ्या गोष्टी नाशवंत आहेत. ह्यात सर्व सजीव निर्जीव येतात. अगदी पंचमहाभूतांचासुद्धा त्यात समावेश होतो.
क्रमश:








