बेळगाव : मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात बुधवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध फेरी काढण्यात आली. सायकल फेरी होऊ नये यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरू होता. परवानगी नाकारणे, ऐनवेळी मार्गात बदल करणे, ठिकठिकाणी तरुणांची अडवणूक करणे असे प्रकार घडूनही मराठी भाषिकांनी आपल्या एकीची वज्रमूठ उपस्थितीने दाखवून देत मराठी अस्मितेची प्रशासनाला पुन्हा एकदा जाणीव करून दिली. 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली. मराठीबहुल बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटक प्रांताला जोडण्यात आला. भाषा, संस्कृती, लोकजीवन हे महाराष्ट्राशी साधर्म्य असतानाही केवळ दडपशाही करत मराठी भूभाग कानडी प्रांताला देण्यात आला. याचाच निषेध मागील 67 वर्षांपासून आंदोलने, सत्याग्रह, मोर्चे यामधून केला जात आहे. 67 वर्षे उलटली तरी अद्यापही या लढ्याची धार कमी झालेली नाही, हे बुधवारी झालेल्या निषेध फेरीतून दिसून आले. आजही तीच जिद्द आणि तीच धग कायम आहे. बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास धर्मवीर संभाजी उद्यानापासून सायकल फेरीला सुरुवात झाली. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ अशा घोषणा देत तरुणाई फेरीमध्ये सहभागी झाली. सुरुवातीला संख्या कमी होती. परंतु, ताशिलदार गल्ली, तानाजी गल्ली तसेच तालुक्यातून हजारोंच्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाले. काळे कपडे, काळ्या टोप्या, काळे मफलर परिधान करून तसेच काळे झेंडे हाती घेऊन सीमावासीय सायकल फेरीमध्ये सहभागी झाले होते.
सीमाप्रश्नासाठी चौथी पिढी रस्त्यावर
सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या कमी होती. यावर्षी मात्र शहरी भागातील तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. सीमाप्रश्नापासून तरुणाई दूर जात आहे, असा आरोप दरवेळी केला जातो. परंतु, तिसरीच काय तर चौथी पिढीही सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सज्ज असल्याचे बालचमूंनी दाखवून दिले. केवळ फेरीत सहभागी न होता, ‘राहू तर महाराष्ट्रात’ अशा घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
बिदर येथील कार्यकर्ते सहभागी
मराठी भाषिकांवर अन्याय केवळ बेळगावमध्येच होतो असे नाही. तर बिदर, भालकी, कारवार येथील मराठी भाषिकांवरही तितक्याच प्रमाणावर अन्याय होत आहे. बुधवारी झालेल्या निषेध फेरीमध्ये बेळगावसोबतच बिदर येथून तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यामध्ये आपणही सहभागी आहोत, हे बिदर येथील तरुणांनी दाखवून दिले. अध्यक्ष दिनेश मुदाळे, हरिरंग बिरादार, दिलीप पवार, किरण निटुरे, दिगंबर बिरादार, परशुराम सगर यांसह अनेक तरुण सहभागी होते.
जागोजागी अडवणूक
सायकल फेरी यशस्वी होऊ नये, उपस्थितांची संख्या कमी दिसावी, यासाठी पोलीस प्रशासनाचा खटाटोप सुरू होता. नाथ पै चौक शहापूर, बँक ऑफ इंडिया चौक, गोवावेस, मराठा मंदिर, महात्मा फुले रोड, कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड या परिसरात वाहनचालकांची अडवणूक केली जात होती. विशेषत: काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या तरुणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु, या ना त्या मार्गाने तरुणांनी सायकल फेरीमध्ये प्रवेश मिळविलाच.
लक्षवेधी फलक
सायकल फेरीमध्ये गोवावेसचा राजा मंडळाचा फलक लक्षवेधी ठरला. ‘बेळगाव सीमाप्रश्नी झुंज आम्ही देऊ, संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हक्काने मिळवू’ या फलकाकडे जनतेची नजर खेचली जात होती. याचबरोबर लहान मुलांच्या हातामध्ये ‘बाबा, आम्ही महाराष्ट्रात कधी जाणार?’ हा फलक लक्ष वेधून घेत होता. याबरोबरच अनेक मंडळांनी आपापले फलक तयार करून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा विषय मांडला होता.
ऐनवेळी मार्गात बदल
सायकल फेरी यशस्वी होऊ नये, तसेच मराठी भाषिक एकत्र येऊ नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाचा सकाळपासूनच खटाटोप सुरू होता. काही वर्षांपूर्वी बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून निघणारी सायकल फेरी आता शहापूर आणि बेळगावच्या काही भागापुरती मर्यादित राहिली आहे. असे असताना बुधवारी सायकल फेरीच्या मार्गात पोलिसांनी अचानक बदल केला. सराफ गल्ली येथून नाथ पै चौक मार्गे गोवावेस येथे जाणारी फेरी सराफ गल्लीमार्गे बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड मार्गे गोवावेस येथे आणण्यात आली. मार्गात ऐनवेळी बदल केल्याने मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
रिक्षालाही घेतला आक्षेप
दरवर्षी सायकल फेरीच्या अग्रस्थानी जागृती करणारी रिक्षा असते. यावर्षीही संभाजी उद्यानामध्ये सायकल फेरीच्या अग्रभागी रिक्षा होती. परंतु, पोलीस प्रशासनाने ऐनवेळी रिक्षावर आक्षेप घेऊन ती बाजूला काढण्याची सूचना केली. काही नागरिकांनी पोलीस प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, वरिष्ठ पोलिसांनी दादागिरी करत रिक्षा बाजूला काढण्यास भाग पाडले. यामुळे पहिल्यांदाच रिक्षा अग्रभागी नसताना सायकल फेरी काढावी लागली.
गणेशपूरचे ‘शेलारमामा’
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गणेशपूर येथील शंकर महादेव शिंदे हे 70 वर्षीय दिव्यांग आजोबा मागील 30 वर्षांपासून सायकल फेरीमध्ये सहभागी होत असतात. त्यांनी संपूर्ण सायकल फेरी चालत पूर्ण केल्याने हा एक औत्सुक्याचा विषय ठरला. दिव्यांग असतानाही सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे आणि आम्हाला आमच्या राज्यात जाऊ द्या, ही त्यांची मागणी सीमावासियांमध्ये स्फुल्लिंग चेतविणारी ठरली.









