नगराध्यक्ष रश्मी देसाई यांची पदभार स्वीकारल्यानंतर पहिली प्रतिक्रिया : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या सहकार्याने सर्वांगीण विकास साधणार
सांखळी : सांखळी पालिका निवडणुकीत भाजपच्या अनुभवी कार्यकर्त्या यांनी काँग्रेसचे नेते धर्मेश सगलानी यांचा पराभव करून आपला ठसा उमटविला आहे. याची दखल घेऊन त्यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ घातली आहे. या पदाला आपण नक्कीच न्याय देणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन पालिका क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधणार, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी दिली. कामाच्या पहिल्याच दिवशी तऊण भारतशी संवाद साधला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्याबाबतीत सांखळी शहर पुढे जात आहेत. तरीही या शहरात नगरपालिका पातळीवरून आवश्यक असलेला सर्व विकास साधून सांखळीला राज्यात एक ‘रोल मॉडेल’ बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार. सांखळीतील साधनसुविधा उभारण्याबरोबरच मानवी विकासावरही तितक्याच गांभिर्याने भर दिला जाणार आहे. सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाविण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील. या सर्व कामांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे जास्तीत जास्त सहकार्य लाभणार असून लोकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन सांखळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी केले.
कचरा प्रकल्पाचे विस्तारिकरण करणार!
स्वच्छ व सुंदर साखळीची संकल्पना सत्यात उतरवताना साखळीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. कचरा उचल प्रक्रिया व त्यावर कचरा प्रक्रिया प्रकल्पातील काम यापुढे जलद गतीने होणार आहे. लोकांच्या समस्या समजून घेत त्यानुसार काम केले जणार आहे. असेही नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी म्हटले.
बाराही प्रभागांचा विकास साधणार!
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊनकाम करण्याची शिकवण दिली आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका क्षेत्रातील बाराही प्रभागात विकासासाठी कार्य करणार आहे. मी नगराध्यक्ष असलेतरी आपल्या प्रशासनात सर्वांना समान काम करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देऊ. शहराचा विकास करतानाच आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा त्याचप्रमाणे आमचे शहर सुंदर शहर बनवण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे देसाई म्हणाल्या. मानवी विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. स्वच्छ निरोगी शहर बनवणे हे आम्हा सर्व नागरिकांच्या हातात आहे. त्यासाठी आम्हाला जरा कडक व्हावे लागेलही त्यासाठी तुमचे सहकार्य महत्त्वाचे आहे. शहरात कोणत्याही व्यक्तीला विनाकारण त्रास होणार नाही यासाठी आम्ही सर्व नगरसेवक संघटिततपणे काम करणार असल्याचे नगराध्यक्ष देसाई म्हणाल्या.
मान्सूनपूर्व कामांसाठी लोकांनी सहकार्य करावे!
सध्या पावसापूर्व कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पालिका प्रशासन कार्यरत आहेच, पण नागरिकांनी ही सहकार्य केल्यास चांगली कामे होऊ शकतात. तसेच आपल्या परिसरात डास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पालिकेचा महसूल वाढण्यासाठी प्रयत्न करणार!
सांखळी शहराचा सर्वांगीण विकास आपण साधणारच आहोत. मैदान, पार्क, सभागृहात, सुशोभिकरण त्याचबरोबर पालिकेचे उत्पन्न वाढवणारे नवीन प्रकल्प राबवणार तसेच बाजारात पार्किंग समस्या, नवीन प्रकल्पात उभारू सोडवणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.
प्रत्येक सरकारी योजनेची माहिती उपलब्ध करू!
सांखळी पालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना सर्व सरकारी योजनेची माहिती उपलब्ध करू देणार असून पालिका क्षेत्रात कोणीही वंचित राहु नये. यासाठी खास प्रयत्न करणार आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे नगराध्यक्ष देसाई यांनी सांगितले.
भटकी गुरे, कुत्र्यांची समस्या जटिल!
सांखळी शहरात आपत्कालीन समस्या सोडवण्यासाठी केंद्र स्थापन होणे आवश्यक आहे. चांगल्या सोयींयुक्त पशु वैद्यकीय पेंद्र उभारण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहोत. पालिका क्षेत्रातील भटकी गुरे, कुत्री आणि इतर जनावरे ही नागरिकांची डोकेदुखी ठरत असल्याने ही समस्या सोडवण्यासाठी खास प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी दिले.









