मनपा आयुक्तांच्या नोटिसीनंतर जाग : करवसुली गोलमाल प्रकरण अंगलट येणार
बेळगाव : उद्यमबाग येथील त्या कंपनीने महापालिकेला सुमारे 3 कोटी ऊपयांहून अधिक कर भरणे बाकी असल्याचे बोलले जात आहे. आठ वर्षांपासून कर भरण्यात न आल्याने हा आकडा कोटीच्या घरात पोहोचला आहे. महापालिकेच्या महसूल विभागात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून करवसुलीत गैरव्यवहार होत असल्याची प्रकरणे आता समेर येऊ लागल्याने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. काहींवर कारवाईची टांगती तलवार असल्याने यातून बचाव करून घेण्यासाठी धावाधाव सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या एका खासगी शिक्षण संस्थेकडून कर भरण्यासाठी चलन देण्यात यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. पण, त्यांना महसूल विभागाने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे प्रकरण जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी संबंधित शिक्षण संस्थेचे सर्व रेकॉर्ड तपासून त्यावर दोन दिवसांत कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्यामुळे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने चलन देण्याची सूचना केली होती. थेट आयुक्तांनीच कान टोचल्याने कर भरण्यासंदर्भात तातडीने चलन मिळेल, असे त्या शिक्षण संस्थेला वाटत होते.
पण, उलट महसूल विभागातील काहींनी गैरव्यवहार करून चलन दिल्याने या प्रकाराचा भांडाफोड झाला. हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने मनपा आयुक्तांनी महसूल उपायुक्तांसह पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली. ही घटना ताजी असतानाच उद्यमबाग येथील एका कंपनीच्या करवसुलीतही गैरप्रकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनीने गेल्या आठ वर्षांपासून कर थकविला असून त्यापोटी मनपाला तीन कोटीहून अधिक ऊपयांचा कर भरणे बाकी असल्याची चर्चा आहे. ही बाबही समोर येताच आयुक्तांनी महसूल विभागातील चौघांना नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर संबंधित कंपनीलाही थकीत कर भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मनपाचा कर बुडण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास भविष्यात अशा प्रकारचे काम करण्याचे धाडस कोणी दाखविणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.









