ग्रामीण भागातील डाकसेवाही ठप्पच
बेळगाव : ग्रामीण डाकसेवकांचे विविध मागण्यांसाठी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात बेळगाव विभागातील ग्रामीण डाकसेवकांनी दुसऱ्या दिवशीही आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प होती. कमलेश चंद्र आयोगाच्या शिफारशींनुसार ग्रामीण डाकसेवकांना वेतनवाढ करून इतर सुविधा उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत आंदोलन केले जात आहे. संपूर्ण देशभर सुरू असणाऱ्या आंदोलनाला बेळगावमधूनही पाठिंबा देण्यात आला. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात ग्रामीण डाकसेवकांनी एकत्रित येत आंदोलन केले. सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवण्यात आले. वेतनवाढ नसल्याने ग्रामीण डाकसेवकांची हलाखीची परिस्थिती असून कमलेश चंद्र आयोगाच्या शिफारसी मान्य करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बेळगाव, रामदुर्ग, खानापूर तसेच इतर तालुक्यांतील ग्रामीण डाकसेवक सहभागी झाले होते.









