ओपन एअर थिएटरचे छत : संपूर्ण गोव्यात उमटली संतापाची लाट,मंत्री गावडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
पणजी : गेली दोन वर्षे दुऊस्तीखातर बंद ठेवलेल्या आणि सुरु असलेल्या बांधकामाच्या दर्जावरुन तसेच एकंदरीत बेकायदेशीरपणे केलेल्या प्रक्रियेबाबत सतत गाजत असलेल्या कला अकादमीच्या प्रकल्पातील खुल्या रंगमंचावरील स्लॅब वजा छत काल सोमवारी पहाटे अचानक कोसळले आणि या बांधकामप्रकरणी भ्रष्टाचाराबाबत जे तर्कवितर्क वर्तविण्यात येत होते त्यांवर शिक्कामोर्तब झाले. या घटनेचे तीव्र पडसाद तथा संतापाची लाट संपूर्ण गोवाभर उमटली आहे. कला अकादमीचे चेअरमन तथा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी संपूर्ण गोव्यात सुऊ झाली. या घटनेनंतर आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आरजीपीचे आमदार विरेश बोरकर तसेच अनेकांनी अकादमीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्य विधानसभेचे वर्षाकालीन अधिवेशन आज सुऊ होत असून पहिल्याच दिवशी या विषयावऊन प्रचंड गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
कला अकादमीच्या दुऊस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी सुऊ झाले. दुऊस्तीचे काम डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण होणार होते, मात्र त्यानंतर 7 महिने उलटले तरी फेरदुऊस्ती पूर्ण झालेली नाही. अलिकडेच दुऊस्ती पूर्ण झालीय आणि लवकरच प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे निवेदन मुख्dयामंत्र्यांनी केले होते.
पहाटे कोसळला छताचा स्लॅब
काल सोमवारी पहाटे कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावरील (ओपन एअर थिएटर) स्लॅबवर विटा ठेवून त्यावर सौंदर्यीकरणाचे काम झाले होते. मात्र पावसामुळे त्यात पाणी गेले. भार सहन झाला नसल्याने संपूर्ण छतच कोसळले. दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी कोणीही तेथे नसल्याने जीवित हानी झाली नाही. तसेच प्रकल्पाचे बांधकाम रेंगाळल्याने आणि प्रत्यक्षात प्रकल्प कार्यान्वित केला नसल्यानेही फार मोठा अनर्थ टळला.
संपूर्ण गोव्यात संतापाची लाट
सोमवारी पहाटेच्या दरम्यान, घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण गोव्यात संतापाची लाट पसरली. तमाम कलाकारांकडून आणि राजकीय क्षेत्रातही कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुऊ झाली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल एवढेच निवेदन केलेले आहे. मंत्री गोविंद गावडे यांनी हे बांधकाम 43 वर्षांपूर्वीचे जुने होते व जे काम हाती घेतले त्याचा तो भाग नव्हता अशी मल्लिनाथी केली. मात्र अकादमीचे चेअरमन या नात्याने सारी जबाबदारी मंत्री गोविंद गावडे यांच्यावर आल्याने सोशल मीडियावर मंत्री गोवडे यांच्याबरोबरच सरकारवर आणि भारतीय जनता पक्षावर जनतेने सडकून टीका केली.
विजय सरदेसाईंकडून स्थगत प्रस्ताव
राज्य विधानसभेत आज या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटणार आहेत. विजय सरदेसाई यांनी या प्रकरणी सभापतींसमोर स्थगन प्रस्ताव देखील मांडलेला आहे.
न्यायालयीन चौकशी करावी : युरी
पणजीतील कला अकादमीचा काही भाग कोसळल्याने जी आपत्ती ओढवली आहे तिची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधी काँग्रेस पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका करून सांगितले की नुतनीकरणाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असून त्यातही मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच हा प्रकार घडला आहे. हे सर्व प्रकरण गंभीर असून सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे आलेमांव म्हणाले.
भाजपकडून गंभीर चर्चा
कला अकादमीचे छत कोसळण्याच्या प्रकरणाची भारतीय जनता पार्टीने गंभीर दखल घेतल्याचे वृत्त असून या संदर्भात एकदोन दिवसांत निर्णय होईल. मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून कला अकादमीचे चेअरमनपद काढून घेतले जाईल, असे संकेत रात्री उशिरा मिळाले.