विदेशमंत्री एस. जयशंकर यांचे वक्तव्य : भारत-जपान फोरमला केले संबोधित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी काळात भू-राजकारणात देशांच्या समीकरणांमध्ये सेमीकंडक्टरची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे वक्तव्य विदेशमंत्री एस. जयशंक यांनी सेमीकंडक्टर क्षेत्राचे महत्त्व विशद करताना केले आहे. विदेशमंत्र्यांनी नवी दिल्लीत आयोजित भारत-जपान फोरमच्या उद्घाटन सत्रात भाग घेतला. जपान सध्या स्वत:च्या सेमीकंडक्टर क्षेत्राला पुनरुज्जीवित करत आहे आणि भारत देखली अत्यंत दीर्घ उपेक्षेनंतर सेमीकंडक्टर मिशनवर काम करत असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारत आणि जपान हे दोन्ही देश मिळून तैवानसोबत काम करत आहेत. मी याला अत्यंत महत्त्वपूर्ण सुरुवात मानतो. हे अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र असून जे आगामी दशकात भू-राजनयिक स्तरावर अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. सेमीकंडक्टर सहकार्याची शक्यता अधिक असेल. आम्ही भारतात स्वत:च्या उच्च शिक्षण प्रणालीत सुधारणा घडवून आणत आहोत. यामुळे गुणवत्तेत सुधारणा होणार असल्याचे उद्गार विदेशमंत्र्यांनी काढले आहेत.
जपानसोबत संबंध उत्तम, परंतु…
भारत आणि जपान या दोन्ही देशांदरम्यान कधीच कुठलीच समस्या राहिली नाही, परंतु समस्या नसण्याचा अर्थ सर्वकाही सुरळीत चालू आहे असा होत नाहे. आज भारतीयांमध्ये विदेशी पर्यटनाबद्दल रुची वाढत आहे. आम्ही दरवर्षी 10-15 टक्क्यांच्या वृद्धीसोबत पासपोर्ट जारी करत आहोत. आम्ह दरवर्षी सुमारे एक ते दीड कोटी पासपोर्ट जारी करत आहोत आणि हे 10 वर्षांची वैधतायुक्त आहेत. परंतु आम्ही अद्याप जपानमध्ये असे पाहिले नाही. जर तुम्ही दक्षिणपूर्व आशिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, आखाती देश, युरोपकडे पाहिल्यास तेथे मोठ्या संख्येत भारतीय पर्यटक जात असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.
चीनसंबंध मांडली भूमिका
भारत या दोन्ही देशांचा चीन हा शेजारी आहे. आमच्यासोबत चीनचे संबंध स्थिर होते आणि दोन्ही देशांचा व्यापारही वाढत होता. परंतु दोन्ही देशांदरम्यान असंतुलित व्यापाराचा मुद्दा कायम आहे. चीनने भारतात गुंतवणूक केली आहे, परंतु दोन्ही देशांचे संबंध सीमेवर जोपर्यंत शांतता राहिल तोपर्यंतच स्थिर राहू शकतात. 2020 मध्ये भारत-चीनच्या सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली, ज्यात अनेक सैनिकांना सर्वोच्च बलिदान द्यावे लागले. यामुळे द्विपक्षीय संबंध प्रभावित झाले आणि सैन्यांना मागे हटविण्यात साडेचार वर्षांचा कालावधी लागला आहे. सध्या अनेक मुद्द्यांवर सहमती होणे अजून शिल्लक आहे. आम्ही आमचे संबंध पुन्हा कसे सुधारू शकतो यावर आम्हाला चीनसोबत बैठक घेत चर्चा करावी लागणार असल्याची भूमिका जयशंकर यांनी मांडली आहे.
ट्रम्प प्रशासनाला श्रेय
क्वाड आकारास येण्याचे खरे श्रेय हे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला द्यावे लागणार आहे. 2017 मध्ये ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळातच क्वाडची उप-मंत्रीस्तरीय चर्चा सुरू झाली होती. यानंतर 2019 मध्ये विदेशमंत्री स्तरीय चर्चा सुरू झाली तेव्हा देखील डोनाल्ड ट्रम्प हेच अमेरिकेचे अध्यक्ष होते. याचमुळे क्वाडच्या वाढत्या प्रभावासाठी ट्रम्प प्रशासनच कारणीभूत असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.









