खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे प्रतिपादन : पत्रकार दिनानिमित्त सत्कार : कन्नड भवन येथे आयोजन
बेळगाव : समाजात प्रसारमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. पत्रकारांच्या व्यावसायिक जीवनात अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करून ते काम करतात. समाजाचे स्वास्थ्य राखण्यात प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. नेहरूनगर येथील कन्नड भवन येथे बेळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लहानपणापासूनच वडिलांमुळे आपल्याला प्रसिद्धी माध्यमांचा परिचय झाला. तंत्रज्ञानामुळे आपण आहे त्या ठिकाणी सर्व घडामोडींची माहिती मिळते. सामाजिक बदलासाठी माध्यमांनी प्रमुख भूमिका वठविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी आमदार राजू सेठ म्हणाले, पूर्वी टेलिव्हिजनचा जमाना नव्हता. बेळगावात सकाळी ‘तरुण भारत’ लोकांच्या हाती पोहोचत होता. टाईम्स ऑफ इंडिया मुंबईतून तीन दिवसांनंतर येत होता, असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अधिकारी, राजकारणी व माध्यमांनी आपली जबाबदारी पार पाडली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी, बातमी देण्याच्या घाईत सत्यासत्यता पडताळून पाहण्याचे प्रकार बंद झाले आहेत. पत्रकारांनी सत्य लोकांसमोर ठेवावे. समाजमाध्यमामुळे अनेक विपरित परिणामही समाजावर होतात, असे सांगितले. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे म्हणाले, वाढती लोकसंख्या आधुनिक जगासाठी एक आव्हान ठरत आहे. प्रसारमाध्यमामुळे जागृतीची कामे होत आहेत. व्हीटीयूचे उपकुलगुरु प्रो. विद्याशंकर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी आमदार संजय पाटील, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, संघटनेचे गौरवाध्यक्ष श्रीकांत कुबकड्डी, अध्यक्ष मंजुनाथ पाटील, उपाध्यक्ष चंद्रू श्रीरामुलू, वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष विलास जोशी, सहदेव माने, मैलारी पटात, अडव्याप्पा पाटील, महांत वक्कुंद, एसीएफ सुनीता निंबरगी आदी यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार
वृत्तपत्र दिन कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. विलास जोशी, एम. के. हेगडे, नौशाद विजापुरे, राजू गवळी, श्रीकांत कुबकड्डी, चंद्रू श्रीरामुलू, महाबूब मकानदार, नागराज एच. व्ही., रमेश हिरेमठ, रोहित शिरोळ, रविराज मब्रूरकर, सुभानी मुल्ला, रवी भोवी आदींचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.









