काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचा सरकारला सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पत्रकार मोहम्मद जुबेर यांना झालेल्या अटकेप्रकरणी सरकारवर अनेक जणांकडून टीका होत आहे. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी याप्रकरणी सरकारला लक्ष्य केले आहे. ‘आमच्या विरोधात काही बोलू नका’ अशी भूमिका सरकारने घेऊ नये अस सल्ला माजी विदेशमंत्री आणि काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी रविवारी दिला आहे.
प्रतिकूल मत समोर येण्याचे कुठलेच कारण सरकारने देऊ नये. ‘आमच्या विरोधात काही बोलू नका’ अशी भूमिका सरकारकडून घेतली जाऊ नये. देशाचा कायदा कुठल्याही प्रकारचे भय आणि भेदभावाशिवाय लागू केल जातोय हे सुनिश्चित करण्यास सरकार निष्क्रीय ठरल्याचा आरोप खुर्शीद यांनी केला आहे.
पंतप्रधान एकतेबद्दल का बोलत नाहीत? गप्प बसणारे पंतप्रधान असते तर गोष्ट वेगळी होती. परंतु हे पंतप्रधान अनेक विषयांवर बोलत असतात, परंतु एकतेच्या मुद्दय़ावर ते बोलणे टाळत आहेत. या देशाला वाचविण्यासाठी एक संयुक्त व्यासपीठाची गरज आहे. संयुक्त व्यासपीठ तयार करण्यास अपयश आल्या स विरोधी पक्षांना इतिहास कधीच माफ करणार नसल्याचे खुर्शीद म्हणाले.









