रत्नागिरी :
श्रावण महिन्याच्या सरींनी कोकणातील निसर्गाला नवसंजीवनी मिळाली असून, रत्नागिरीतील कातळसड्यांवर रानफुलांचा अनोखा उत्सव बहरला आहे. येथील विविध ठिकाणचे कातळसडे विविध प्रकारच्या रानफुलांनी आच्छादले असून, – हे दृश्य निसर्गप्रमी आणि पर्यटक अशा साऱ्यांच्याच डोळ्यांना सुखद अनुभव देत आहे.
पावसाळ्यात कोकणचे सौंदर्य अधिकच खुलते. या श्रावण मासात हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत असलेल्या कातळसड्यांनी विविध रंगांची उधळण केली आहे. येथे तिरड्याची रानफुले, कारवी, टोपली कारवी, निळपुष्पी,सडसडी, सोनकी, जांभळीपुष्पी, सोनतळ अशा अनेक प्रकारच्या रानफुलांनी कातळसड्यांवर जणू काही रंगीबेरंगी पांघरूणच घातल्याचा भास होत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत आहेत.
या रानफुलांना धार्मिक आणि औषधी असे दोन्ही महत्त्व आहे. श्रावण महिन्यात विविध सणांसाठी या फुलांचा वापर केला जातो. अनेक रानफुले औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्यामुळे त्यांचे महत्त्व अनमोल आहे.
दुर्दैवाने, हे सुंदर आणि दुर्मिळ कातळसडे सध्या धोक्यात आहेत. बेसुमार आणि अनधिकृत अशा अतिक्रमणांमुळे या संवेदनशील परिसंस्थेचे संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळे या रानफुलांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून, त्यांच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनमोल ठेवा जपण्यासाठी आणि चिरेखाणी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
▶ दुर्मिळ रानफुलांचा मनमोहक उत्सव
▶ निसर्गप्रेमी आणि पर्यटक सुखावले








