बेळगावच्या दोघा जणांना केवळ 12 तासांत अटक : 1 लाख 82 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त
बेळगाव : कित्तूर येथील एका सराफी दुकानातील चोरीचा केवळ 12 तासांत छडा लावण्यात कित्तूर पोलिसांना यश आले आहे. बेळगाव येथील एका अल्पवयीन मुलासह दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून 1 लाख 82 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 28 जुलै रोजी पहाटे 3 ते 4 यावेळेत कित्तूर येथील श्री मानआज्जा ज्युवेलर्स या सराफी दुकानाचे शटर उचकटून 31 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1 किलो चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 82 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज पळविण्यात आला होता. याप्रकरणी सुब्रमण्यम मार्तंडप्पा पत्तार, रा. सोमवार पेठ, कित्तूर यांनी फिर्याद दिली होती.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एम. वेणुगोपाल, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरीच्या घटनेनंतर केवळ 12 तासांत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात श्रीनगर-बेळगाव येथील अबुबकर सिकंदर सनदी (वय 23) या तरुणासह अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. एच. एफ. डिलक्स मोटारसायकलवरून कित्तूर गाठून या जोडगोळीने सराफी दुकानात चोरी केली होती. शटर उचकटण्याबरोबरच कटरने शटरचा काही भाग कापून काढण्यात आला होता. पोलिसांनी या जोडगोळीकडून मोटारसायकलही जप्त केली आहे. चोरीच्या घटनेनंतर केवळ 12 तासांत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस पथकातील बी. एस. सिदनाळ, एस. एस. बळ्ळारी, आर. एस. शेली, एस. आर. मठद, एस. बी. हुनशीकट्टी, एस. ए. दफेदार, ए. एम. चिक्केरी, एम. एस. हळ्ळी, व्ही. आय. हडपद, एम. सी. इटगी, जे. जी. लमाणी आदींचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी कौतुक केले आहे.









