पोलिसांना मारहाण ;संशयित वरुड परिसरात लपून बसल्याची पोलिसांची माहिती
औंध / वार्ताहर :
औंध ता. खटाव येथील पोलीस ठाण्याचे लॉक अप तोडून दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना पहाटे 3 वाजता औंध येथे घडली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने पोलीस दल हादरले आहे. आज सकाळपासून विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस प्रमुख अतिरिक्त पोलीस प्रमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम औंधमध्ये तळ ठोकून आहे. दरम्यान संशयित आरोपी वरुड व सि.कुरोली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून सकाळी 7.30 च्या दरम्यान पोलीसांचे पथक वरुड येथे संशयितांना पकडण्यासाठी गेले आहे.
सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले (सर्व रा. बीड व अहमदनगर जिल्हा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
संशयित दरोडेखोरांना नुकतेच गंभीर गुन्ह्यात अटक केलेली आहे. पोलीस कोठडीत असल्याने त्यांना लॉक अप मध्ये ठेवण्यात आले होते. आज पहाटे मात्र ताकदीच्या जोरावर दरोडेखोरांनी लॉक अपचे दार तोडून पोलिसांना मारहाण करत औंध पोलिस ठाणे हादरवून सोडले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल अलर्ट झाले असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.









