आंदोलन केल्यानंतर आले यश : श्रावण सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : कणबर्गी येथील मुख्य रस्त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा रस्ता अर्धवट करण्यात आला होता. रस्ता उखडण्यात आला होता. त्यामुळे त्या रस्त्यावरुन ये-जा करणे अवघड झाले होते. तो रस्ता तातडीने पूर्ण करावा, यासाठी रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वीच हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानला मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. त्या ठिकाणी श्रावणमासामध्ये पूजेचे आयोजन केले जाते. दररोज हजारो भाविक त्या ठिकाणी जाऊन श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ देखील घेतात. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वीच हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
संतापून शेतकऱ्यांचा रास्ता रोको
बेळगाव-गोकाक रोडपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून उखडून ठेवण्यात आला होता. त्या रस्त्यावरुन ये-जा करणेही अवघड झाले होते. शेतकऱ्यांना गवत नेणे याचबरोबर बैलगाडी नेणे देखील अवघड झाले. शेतकऱ्यांनी संतापून चार दिवसांपूर्वी कणबर्गी येथे रास्ता रोको केला होता. कंत्राटदाराला अनेकवेळा सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळेच हा रस्ता रोको ग्रामस्थांनी केला होता. आता या कामाला सुरूवात झाली आहे. खडी टाकणे तसेच सपाटीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र आता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामस्थ आणि भाविकांना खुला करावा, अशी मागणी होत आहे.









