कोल्हापूर :
शाहूपुरी पहिल्या गल्लीमध्ये महापालिकेच्या अजब कारभाराचा नमुना शनिवारी नागरिकांना पहावयास मिळाला. शुक्रवारी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेला रस्ता शनिवारी खोदण्यात आला. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या वतीने ड्रेनेज लाईनचे चोकअप काढण्यासाठी ही खोदाई केल्याचे सांगण्यात आले.
शाहूपुरी येथील पहिल्या गल्लीमधील रस्त्याची गेल्या 10 वर्षापासून दुर्दशा झाली होती. अखेर 10 वर्षानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. शुक्रवारी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र शनिवारी सकाळी पुन्हा या रस्त्याची खोदाई करण्यात आली. नवीन चकचकीत केलेला रस्ता अवघ्या 30 तासांमध्ये पुन्हा खोदल्याने नागरिकांमधून महापालिकेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
याबाबत परिसरातील नागरिकांनी ड्रेनेज कंत्राटदाराकडे विचारणा केली असता, गल्लीतील ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे या रस्त्याची खोदाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्याभरापासून या गल्लीमधील ड्रेनेज तुंबले होते. याबाबत महापालिकेने ड्रेनेज काढण्याचे प्रयत्न केले होते. मात्र ड्रेनेज लाईनलचा प्रश्न निकाली निघाला नाही. यामुळे ड्रेनेजच्या मॅनहोलचे काम करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला. मात्र हे ड्रेनेजचे काम नवीन रस्त्याचे काम करण्यापूर्वीच का केले नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. काही काळ नागरिकांनी ड्रेनेजच्या कामास विरोध करत काम थांबविले होते. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ड्रेनेजचे काम झाल्यानंतर मॅनहोलच्या जागेत पुन्हा पॅचवर्क करण्याचे आश्वासन दिले.








