घाईघाईने काम उरकल्याने आश्चर्य : पुन्हा रस्त्यावर गळतीचे पाणी तुंबू लागले
बेळगाव : गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या शौर्य चौक ते लक्ष्मीटेक दरम्यानच्या रस्त्याचे दोन दिवसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आल्याने पुन्हा रस्त्यावर गळतीचे पाणी तुंबू लागले आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यापूर्वी घाईघाईने डांबरीकरणाचे काम उरकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या वर्षभरापासून शौर्य चौक ते लक्ष्मीटेक दरम्यानच्या एमएलआरसी परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून वाट शोधताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.
मात्र रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिक शहराकडे ये-जा करण्याकडे या रस्त्याचा वापर करतात. त्याचबरोबर चंदगड परिसरातील लोकदेखील याच रस्त्याचा वापर करतात. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडून अक्षरश: रस्त्याची चाळण झाली होती. त्यातच लक्ष्मीटेक जलशुद्धीकरण प्रकल्पापासून ते शहराकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीसाठी रस्त्याच्या बाजूने खोदाई करण्यात आली होती. त्यामध्ये माती आणि दगड टाकून चर बुजविण्यात आली होती. पण डांबरीकरण करण्यात न आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता.
आंधळ्या कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी
तसेच जलवाहिनीला गळती लागल्याने रस्त्यावर पाणी झिरपत होते. सदर गळती काढण्याकडे एलअँडटीने दुर्लक्ष केले आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र पुन्हा रस्त्यावरच पाणी तुंबत आहे. सदर गळती काढण्यासाठी नुकताच करण्यात आलेला रस्ता पुन्हा खोदला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंधळ्या कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.









