कोल्हापूर :
क्रशर चौक येथील रंकाळा तलावाकडे जाणाऱ्या श्याम सोसायटी नाल्यावरील पुलाचा काही भाग बऱ्याच दिवसापूर्वी कोसळला आहे. त्यातच आत रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. राधानगरी, गगनबावडा, कोकणासह गोवा राज्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथे अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. या खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून स्थानिक नागरिक व वाहनचालकांतून भीती व्यक्त केली जात आहे. महापलिका प्रशासनाने तत्काळ यावर उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
क्रशर चौक हा शहराससह उपनगरातील एक महत्त्वाचा आणि वर्दळीचा परिसर आहे. रंकाळा तलाव, शालिनी पॅलेस, परिसरातील उपनगरे, अनेक वसाहती, कॉलन्या व आसपासच्या पर्यटनस्थळांमुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. श्याम सोसायटीजवळून रंकाळ्यात सोडल्या जाणाऱ्या नाल्यावरील पूल हा या भागातील वाहतुकीचा कणा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर खड्डे व साधारणत: रस्त्याचा निम्मा भाग खचलेला दिसून येत आहे.
पावसामुळे नाल्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने आणि रस्त्याच्या खालील माती खरडली गेल्याने हा खचण्याचा प्रकार घडला असावा, असे अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आता यापुढे पावसाचे दिवस असल्याने पाण्याच्या प्रवाह आणखी वाढणार आहे. वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे धोका वाढणार असल्याचे बोलले जात आहे. एखादी दुर्घटना घडण्याआधीच प्रशासनाने पावसापूर्वीच याचे काम हाती घेण्याची गरज आहे.
या खचलेल्या भागामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, वाहनचालकांना अरुंद जागेतून वाहने हाकावी लागत आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. हा रस्ता राज्य मार्गाचा भाग असल्याने येथे ट्रक, डंपर आणि इतर अवजड वाहनांची वाहतूक सतत सुरू असते. त्याचबरोबर नोकरदार, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामीण भागातून कामानिमित्त येणारे नागरिक याचा मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे 24 तास या मार्गावरून वाहतूक सुरू असते.
- रात्रीच्यावेळी धोका अधिक
याठिकाणी काहीवेळा स्ट्रीटलाईट बंद असतात. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे खचलेला रस्त्याच्या भागाची स्पष्ट माहिती नसल्याने याचा धोका वाढला आहे. रात्री समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे काहीवेळा समोरचे काहीच दिसत नाही. अशावेळी या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यावर पट्टी
गतवर्षी या पुलापासून काही अंतरावर मत्स्य केंद्रामध्ये एक कार कोसळली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. खचलेल्या रस्त्यावरून एखादे वाहन घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्ता खचुन वर्षाचा कालावधी होत आला असला तरी मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला हा धोकादायक रस्ता दिसत नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष
याबाबत महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. हा रस्ता खचलेला आहे याची माहिती प्रशासनाला आहे. पण दुरुस्तीचे काम का सुरू होत नाही? पावसाळ्यात पाण्याचा निचरा नीट न झाल्याने आणि नाल्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या उद्भवली असल्याचे वाहन चालक अजित कांबळे यांनी सांगितले.
- कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
शहरात पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याच्या आणि रस्ते खचण्याच्या समस्या नेहमीच भेडसावतात. नाल्यावरील पुलाची रचना आणि त्याची नियमित देखभाल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तात्पुरती डागडूजी ऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे एका नागरिकाने सांगितले.
- अपघताला निमंत्रण
याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रस्ता दुरुस्ती आणि नाल्याच्या साफसफाईसाठी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या समस्येचे गांभिर्य ओळखून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळू शकते, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.








