सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ दखल घेण्याची मागणी
ओटवणे प्रतिनिधी
फुकेरी येथील शिवकालीन हनुमान गडावर जाणाऱ्या रस्त्याची पहिल्या पावसातच दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यासाठी सुमारे ९३ लाख रुपये खर्च करण्यात आले असून याची सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ दखल घेऊन हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी ग्रामपंचायतच्या सदस्या सौ जोस्ना शंभा आईर यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर यावर्षी हा रस्ता करण्यात आला. त्यामुळे हनुमंत गडावर जाणाऱ्या पर्यटकांसह फुकेरी ग्रामस्थांमध्ये समाधान होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तसेच अंदाजपत्रकामुळे काम न केल्यामुळे पहिल्या पावसातच रस्त्यावर दरड कोसळण्यासह रस्त्याची साईडपट्टीही खचली आहे. भर रस्त्यावरच दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे हनुमान गडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाने याची तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर कोसळलेल्या दरडी हटवून हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यासह खचलेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांची डागडुजी करावी. अन्यथा पावसाळ्यात यापेक्षाही दयनिय अवस्था रस्त्याची होणार असून याचा फटका हनुमंत गडावर जाणाऱ्या पर्यटकांसह फुकेरी ग्रामस्थांना बसणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्या सौ जोस्ना आईर यांनी सांगितले.









