रस्त्यावर पावसामुळे निसरड : दुचाकीस्वार पडून अपघातांच्या घटना : त्वरित दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
येथील रामदेव गल्लीपासून ते कल्लाप्पा पाटील यांच्या दुकानापर्यंतच्या हुतात्मा मारुती बेन्नाळकर मार्ग त्वरित दुरुस्त करावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. दोन वर्षापासून हा रस्ता अनेक कारणांमुळे खणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर पावसामुळे निसरड होत आहे. निसरडीमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. चारचाकी वाहने रस्ता सोडून घसरत आहेत. तरी संबंधीतांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे..
ग्राम पंचायतकडून खोदकाम
या रस्त्याची बांधणी करण्यासाठी दोन वर्षापूर्वी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र त्या रस्त्याची निमिर्ती न करताच तो तसाच ठेवण्यात आला होता. शिवाय काही महिन्यापूर्वी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन घालण्यात आले आहेत. त्यावेळी सुद्धा या रस्त्याचे खोदकाम केले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता हा चिखलमय झाला आहे. तर ठिकठिकाणी मोठमोठे ख•s पडले आहेत. या ठिकाणी पावसामुळे पाणी थांबले आहे. तसेच लालमाती असल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
गटारीचे बांधकाम
या रस्त्याच्या दोन्ही बाजुनी आमदार फंडामधून गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी सुद्धा गटार खोदकाम करताना रस्त्यावरच्या मातीमुळे मोठ्याप्रमाणात चिखल झाला आहे. येथील रहिवाशांना रस्त्यावरून ये-जा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाय घसरून पडून जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
दुचाकी-चारचाकी नेणे अवघड
या भागातील रहिवाशाना आपल्या दुचाकी-चारचाकी गाड्या घरापर्यंत नेणे हे जिकीरीचे झाले आहे. रस्त्यावर निसरड होत असल्याने दुचाकी आणि चारचाकी घरापासून लांब लावून त्याची सुरक्षा रामभरोसे धोका पत्करून रस्त्यावरच लावाव्या लागत आहेत.
गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त करा
तरी या भागातील लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे. गणेशोत्सवाच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा या भागातील नागरिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
गल्लीत हुतात्मा मारुती बेन्नाळकरांचे निवासस्थान
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात जाण्यासाठी जो लढा उभारण्यात आला होता. त्या लढ्यामध्ये कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांचे निवासस्थान याच गल्लीत आहे. निवासस्थानामध्ये हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई बेन्नाळकर या राहतात. त्या वृद्धापपणामुळे वारंवार आजारी असतात. परंतू रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने त्यांना दवाखान्यामध्ये नेताना त्रास सहन करत जावे लागत आहे. तरी याची दखल ग्राम पंचायत व लोकप्रतिनिधीनी घेऊन रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी बेन्नाळकर नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.









