वार्ताहर/हलशी
हलशी-मेरडा रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून संपूर्ण रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना या रस्त्यावरुन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गणपती सणानिमित्त उद्योग व्यवसायासाठी असलेले ग्रामस्थ गावाकडे येणार आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. यासाठी या तात्पुरती रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांतून होत आहे.
हलशी ते मेरडा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला होता. उन्हाळ्यात कंत्राटदाराने कामही सुरू केले होते. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कंत्राटदाराने दोन्ही बाजूचा रस्ता उखरला होता. त्यामुळे दोन फुटाची चर निर्माण झालेली आहे. तसेच असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. जागोजागी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्यामुळे या रस्त्यावर डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन या चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर छोट्यामोठ्या अपघाताची मालिका सुरू झाली आहे. हलगा येथील मराठी शाळेसमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने विद्यार्थ्यांना रस्त्याच्या पलीकडे जाताना गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे. शाळेसमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने येथून वाहने जाताना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हलशी ते नागरगाळीपर्यंत असलेल्या गावातील नागरिकांना या रस्त्यावरुन प्रवास करताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वेळोवेळी मागणी करून सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तसेच कंत्राटदारावर कारवाईबाबत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या भागातील लोक नोकरी व्यवसायानिमित्त महाराष्ट्र, गोव्यासह इतर राज्यात आहेत. गणेशोत्सवानिमित्त गावाकडे येणार आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन मोठी वर्दळ होणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने सणापूर्वी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









