प्रतिनिधी /वास्को
वरूणुपरी मांगोरहिल वास्को येथील अय्यप्पा मंदिरासमोरील रस्त्यावर टाकण्यात आलेला मातीचा भराव अद्याप उचलण्यात आलेला नाही. मंगळवारी सकाळी तेथील पारंपरीक रस्त्यावर दगड मातीचा भराव घालून नौदलाने रस्ता बंद केला होता. त्यामुळे या भागात लोकांमध्ये संताप पसरला होता. आमदार दाजी साळकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन नाराजी व्यक्त केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
सदर रस्त्याच्या प्रश्नी न्यायालयानेही तो रस्ता खुला ठेवण्याचा आदेश दिलेला असला तरी नौदल हा रस्ता बळजबरीने बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याने वाद पुन्हा वाढलेला आहे. मंदिर समिती व स्थानिक नागरीकांनी ती माती हटवून रस्ता त्वरीत खुला करण्याची मागणी मंगळवारी केली होती. परंतु ती माती नौदलाने किंवा पालिकेनेही हटवलेली नाही. विशेष म्हणजे हा रस्ता पालिकेचा असूनही पालिकेने हा रस्ता बंद करण्याच्या प्रकाराची दखल घेतलेली नाही. त्यामुळे रस्ता बंदच राहिलेला आहे.
दुसरा रस्ता आहे, तो अधिकृत रस्ता नसल्याचा नौदलाचा खुलासा
दरम्यान, या प्रश्नी नौदलावर मंदिर समिती व नागरिकांकडून आरोप होत असल्याने नौदलानेही खुलासा केला आहे. माती घालून बंद करण्यात आलेला रस्ता अय्यप्पा मंदिर व तेथील नागरिकांसाठी अधिकृत रस्ता नव्हे. त्यांच्यासाठी वरूणापुरी येथील अय्यप्पा मंदिराच्या मागे असलेल्या श्रीराम मंदिरासमोरील रस्ता अधिकृत रस्ता असून त्याचा अन्य मंदिर, चर्च तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाण्याच्या टाकीसाठीही उपयोग होत आहे. त्या रस्त्यावर कसल्याच अडचणी नाहीत असे नौदलाने म्हटले आहे. तसेच काही जण देशाची सुरक्षा पाहणाऱया नौदलाविरूध्द विविध प्रकारच्या तक्रारी दाखल करून नाहक सतावणुक करीत आहेत असा दावाही नौदलाने केला आहे.









