डांबरीकरणाकडे दुर्लक्ष : स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. मात्र आदर्श विद्या मंदिर शाळेसमोरील सर्वोदय कॉलनी ते आदर्शनगरपर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून सर्वत्र खड्डे निर्माण झाले आहेत. कित्येक वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
वडगाव आणि शहापूर परिसरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच काही अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणदेखील केले आहे. मात्र आदर्श विद्या मंदिर शाळेसमोरील रस्त्याच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. हा रस्ता बॅ. नाथ पै चौकाला जाऊन मिळतो. तसेच या मार्गावर शाळा आणि वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशन असल्याने नागरिकांची वर्दळ नेहमी असते. हिंदवाडी तसेच शहापूर परिसरात जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. पण सध्या या रस्त्याची दैनावस्था झाली असून डांबर वाहून गेल्याने खडी उखडली आहे. ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
खड्डय़ांतून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत
येथील खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकी वाहनधारक घसरून पडत असल्याने अपघात घडत आहेत. मोठा आणि महत्त्वाचा रस्ता असूनही विकासापासून वंचित आहे. या रस्त्यावरून पथदीप बंद असल्याने खड्डय़ांतून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचा विकास करावा, अशी मागणी सातत्याने करूनही कानाडोळा केला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या रस्त्याचा विकास करावा, अशी मागणी येथील रहिवासी व वाहनधारक करीत आहेत.