कोल्हापूर :
लाईन बझार येथील भाऊसो महागावकर शाळा (चार नंबर फाटक) ते सेवा रुग्णालय या रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांसह परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सध्या चालू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दैना उडाली असुन खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती सध्या झाली आहे. लाईन बाजारमधील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसुन येते. रस्त्यावर पडलेले खड्डे मोठे असून एखादा जोरदार पाऊस पडला तर त्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. त्याचबरोबर या परिसरातील चार नंबर फाटक येथे महापालिकेची शाळा व विविध शासकीय कार्यालये असल्याने तेथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व शासकीय कर्मचारी जात असताना अंगावर खड्ड्यातील पाणी उडत असल्याने अनेक वेळा वाहनधारकांबरोबर वादाचे प्रसंग घडत आहेत.
या रस्त्यावर काही महिने आधी पॅचवर्क केले होते. पण ते पूर्ण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या बारीक खडीमुळे वाहनधारकांसह नागरीकांना त्यास होत असल्याने आणि नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बारीक खडी आता मुख्य रस्त्यावरून थेट रस्त्याच्या कडेला आली आहे. अशातच रस्त्यावर दगडांचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांची दुचाकी घसरत आहेत. छोटे-मोठे अपघात सतत होत आहेत. सध्या किरकोळ अपघात सातत्याने घडत आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड असल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने वारंवार पंक्चर होत आहेत. मात्र या सगळ्या घटनांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
- रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची गरज
हा प्रमुख रस्ता असून या परिसरात अनेक उच्च पदस्थ अधिकारी राहत असून परिसरातील दवाखान्यात रोज रुग्णाची गर्दी असते. या रस्त्यावरील खड्ड्या बाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र अजूनही या खड्डे तसेच आहेत, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याची दुरुस्ती मागे झाली होती मात्र पाऊस सुरू होताच पुन्हा रस्त्याला खड्डे झाल्याने प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. वारंवार रस्ता खराब होत असल्याने हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची गरज आहे.
– आशिष जाधव,नागरिक








