कोल्हापूर / अवधुत शिंदे :
कोल्हापूरातून वडणगे गावाकडे वळण घेतल्यानंतर सुरवातीच्या टप्प्यावर कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावरील पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर पहिल्याच वळणावर मोठी चर पडली आहे. या चरीमुळे आणि रस्त्यावरील असमतोलामुळे येथील वाहन नेताना अपघाताचा धोका वाढला आहे. चर पडलेल्या रस्त्याचा भाग इतका खोल गेला आहे की दुचाकी किंवा चारचाकी वाहन गेल्यास चालकाचे नियंत्रण सहजपणे सुटू शकते. त्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरुन रोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये–जा होत असल्याने धोका अधिकच वाढला आहे.
कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर शिवाजी पुलापासून एक किलोमीटर वडणगे फोटा लागतो. हा रस्ता गावाच्या प्रमुख रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या भागातून रोज शालेय विद्यार्थी, कामगार, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. व्यापाऱ्यांची वाहतूक याच रस्त्याने होत असते. दरम्यान गावाकडून वडणगे फाट्याकडे येणारा रस्त्याही अगदी दीड किलोमीटरवर खड्ड्यांनी भरला आहे. या रस्त्यावर हॉटेलची संख्या अधिक असल्याने रात्री वाहनांची मोठी गर्दी असते. परिणमी वडणगेकडून थेट कोल्हापूरकडे येणाऱा वाहनधारकांना वेगावर नियंत्रण ठेवावे लागत आहे.
- वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
या रस्त्यावर पहिल्याच वळणावर मोठी चर पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा समाना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी येथील रस्त्यांवर दिवे नसल्याने पुढील रस्ता नीट दिसत नाही. त्यामुळे येथे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनचालक रस्ता चुकवण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या वाहनांना धडकण्याचा धोका अधिक आहे.
- ग्रामपंचायतीकडून तत्काल उपाययोजनेची गरज
वडणगे ग्रामपंचायतीने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. ज्या ठिकाणी चर पडली आहे. त्या ठिकाणी मुरुम टाकल्यास या रस्त्यावऊन प्रवास करण्यास सुलभता येईल.
- रस्त्यांच्या दोन्ही बाजूस पथदिव्यांची गरज
कोल्हापूरातून वडणगे गावाकडे वळण घेतल्यावर सुरवातीच्या टप्प्यावर रस्त्यात मोठी चर पडली आहे. रस्त्यावर दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करताना रस्त्यावर कोठे चर आहे, हे दिसून येत नाही. अपघात होऊ नये, यासाठी प्रशासनाने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदिवे लावण्याची आवश्यकता आहे.
- रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारे परिणाम
अपघाताचा धोका : रस्त्यावर मोठी चर पडल्याने गाडी सरळ रेषेत चालवणे कठीण होते आणि नियंत्रण सुटण्याची शक्यता असते.
वाहनांचे नुकसान : हा रस्ता खराब असल्यामुळे वाहनांच्या टायर्स, सस्पेन्शन यावर परिणाम होतो. त्यामुळे वाहनांच्या दुरूस्तीचे प्रमाण वाढले आहे.
कोल्हापूरातून वडणगे गावाकडे जाताना वळण घेतल्यावर सुरवातीच्या अंतरावर रस्त्यावर मोठी चर पडली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरुन प्रवास करणे फार अवघड झाले आहे. या ठिकाणी लाईट नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
– विश्वजीत गडकरी, रहीवासी, वडणगे








