सहा महिन्यात 1.82 लाख प्रवाशांचा प्रवास
बेळगाव : बेळगाव विमानतळ हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्याने तिन्ही राज्यांतील प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरत आहे. यामुळे प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1 लाख 82 हजार 547 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. विमान फेऱ्यांची संख्या कमी होऊनही प्रवासीसंख्या मात्र वाढत असल्याने नवीन शहरांना विमान फेरी सुरू करण्याची मागणी होत आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेमुळे विमान प्रवास करणे सर्वसामान्यांना शक्य झाले आहे. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा सुरू असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह आर्थिक राजधानी मुंबई, राज्याची राजधानी बेंगळूर, आयटी हब हैदराबाद यासह तिरुपती, नागपूर, अहमदाबाद, जयपूर या शहरांनाही विमानसेवा सुरू आहे.
जानेवारी 2024 पासून प्रत्येक महिन्यात अंदाजे 30 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. याबरोबरच कार्गो वाहतूक करण्यात येत आहे. मौल्यवान दागिन्यांसह इतर साहित्याचीही ने-आण केली जात असल्याने कार्गो सेवेचा विस्तार वाढला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत 13 मेट्रिक टन इतकी माल वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील अर्धवर्षामध्ये 2 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये प्रवासी संख्येत घट
सुट्यांचा कालावधी संपून पावसाला सुरुवात झाल्याने जून महिन्यात प्रवासी संख्या कमी झाली. मे महिन्यात 32,045 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. जून महिन्यात 29,982 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे जून महिन्यात प्रवासी संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. गणेशोत्सवानंतर प्रवासी संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.









