सोन्याळ :
सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढ होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात तर सोन्याने विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, मागील २४ दिवसांत या मौल्यवान धातूच्या किमतीत तब्बल ४,३०० रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२२ एप्रिल रोजी प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ९७,२०० रुपये होता. तो आता ९२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर आला आहे. यामुळे एक लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता असलेल्या सोन्याचे दर नियंत्रणात आले आहेत. लाग्ग्रसराईच्या पार्श्वभूमीवर आता ग्राहक खरेदीसाठी उत्सुक झाले असून सराफा दुकाने ग्राहकांनी गजबजली आहेत.
- चांदीच्या दरातही मोठी घट
फक्त सोन्याच नव्हे, तर चांदीच्या किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. मागील सत्रात ९७,४०० रुपये प्रति किलो दर असलेली चांदी गुरुवारी १,७०० रुपयांनी घसरून ९५,७०० रुपयांवर आली. चांदीही मागील काही दिवसांपासून सतत घसरत असल्याचे आता सराफा व्यापायांचे म्हणणे आहे.
- घसरणीचे कारण काय ?
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका व चीन यांच्यात ९० दिवसांसाठी आयात शुल्क कमी करण्याचा करार झाल्याने व्यापार वृद्धीची भीती कमी झाली आहे. परिणामी, सुरक्षित मालमत्तेतील गुंतवणूक कमी झाली असून गुंतवणूकदार इतर पर्यायांकडे वळत आहेत. याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.
तसेच मान्सूनची प्रतीक्षा सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी नफा मिळवण्यासाठी जुने सोने विक्रीस काढले आहे. यामुळे बाजारात पुरवठा वाढला असून त्याचा परिणामही किमतींवर झाला आहे. किमती कमी झाल्याने लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी पुढे येत आहेत. सराफा व्याप्यांनीही सवलतीसह विविध ऑफर्स दिल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
सध्या किमती घसरत असल्या तरी जागतिक घडामोडी, चलनवाढीचा दर व तेलाचे भाव यानुसार सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरेदीस इच्छुक ग्राहकांनी योग्य वेळ साधून खरेदी करावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.








