पीएम झाल्यावर दहशतवादी हल्ले बंद : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा दावा
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील दंगली समाप्त झाल्या. तर देशाचे पंतप्रधान झाल्यावर देशातील दहशतवादी हल्ले बंद झाल्याचा दावा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. मुख्यमंत्री योगींनी सोमनाथ मंदिरात दर्शन घेत पूजा केली आहे. योगी हे सलग चार दिवसांपासून गुजरातमध्ये भाजपसाठी प्रचार करत आहेत. सोमनाथ, गरियाधार, सावरकुंडलामध्ये त्यांनी जाहीरसभा घेतली आहे.
सरदार पटेल हे सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करू इच्छित होते, परंतु मुस्लीम मतपेढीमुळे काँग्रेस हिंदूंच्या श्रद्धेचा आदर करत नव्हता. सोमनाथाचे भव्य मंदिर पुन्हा उभे रहावे अशी काँग्रेसची इच्छा नव्हती. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे हे शक्य झाल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
काँग्रेसने तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना येथील कार्यक्रमात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. 1990 मध्ये भगवान सोमनाथाचे आशीर्वाद घेत अयोध्येपर्यंत रथयात्रा सुरू करण्यात आली होत. भगवान सोमनाथाच्या चरणी घेण्यात आलेला संकल्प आता पूर्ण होत असल्याचे योगींनी म्हटले ओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताचा वारसा नव्या उंचीपर्यंत नेण्याचे काम केले जात आहे. वारशाच्या सन्मानासह स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च् बलिदान करणाऱया अमर हुतात्म्यांबद्दल देश कृतज्ञता दर्शवत असल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत.
दिल्लीतील आम आदमी पक्षाचा ‘नमूना’ गुजरातमध्ये आला आहे. हा नेता दहशतवादाबद्दल सहानुभूती बाळगणारा आहे. या नेत्याने राम मंदिराला विरोध केला होता. भारतीय सैन्याने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केल्यावर तो शूर जवानांकडून पुरावे मागत होता. आम आदमी पक्ष सैन्याच्या शौर्यावर संशय व्यक्त करत असल्याचा आरोप योगींनी केला आहे.









