म. ए. समितीच्या बैठकीत शेतकऱयांचा निर्धार : रिंगरोडला सर्व ताकदीनिशी करणार विरोध
प्रतिनिधी / बेळगाव
सीमाभागातील मराठी भाषिकांना संपविण्यासाठी विकासकामाच्या नावाखाली शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. हलगा सांडपाणी प्रकल्प, त्यानंतर सुवर्णसौध आणि हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी जमिनी हिसकावून घेतल्या गेल्या. त्यानंतर आता रिंगरोडच्या नावाखाली मराठी बहुल भाग असलेल्या गावांमधील शेतकऱयांच्या जमिनी घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र आम्ही कदापिही जमिनी देणार नाही. आता प्रथम कायदेशीररित्या हरकत दाखल करणार त्यानंतर रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे.
तालुका म. ए. समितीच्यावतीने ओरिएंटल स्कूलच्या सभागृहात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये हा निर्धार करण्यात आला. म. ए. समितीच्या झेंडय़ाखाली हे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले
आहे. रिंगरोडमध्ये तालुक्मयातील जवळपास 31 गावांमधील शेतकऱयांच्या जमिनी जाणार आहेत. तब्बल सहापदरी रस्ता करण्याचा घाट घातला गेला आहे. इतक्मया रुंदीच्या रस्त्यामध्ये हजारो एकर सुपीक जमीन जाणार
आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे यावेळी ठामपणे शेतकऱयांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार कशा प्रकारे अन्याय करत आहे, विविध प्रकल्पांसाठी जमिनी घेत आहे. त्यातून येथील मराठी भाषिक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. तेंव्हा सर्व ताकदीनिशी त्याला विरोध करायचा आहे. शेतकऱयांनी संघटितपणे राहून हा लढा लढायचा आहे. या लढय़ाचे नेतृत्व म. ए. समिती घेणार आहे आणि या रस्त्याला तीव्र विरोध करणार आहे, असे स्पष्ट केले.
बैठकीला 26 गावांतील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. काही शेतकऱयांची जमीन पूर्ण जात आहे. त्यामुळे हे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. याचबरोबर या शेतीवर अवलंबून असलेली जनावरेदेखील पाळणे अवघड होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे या बैठकीत सांगितले.
यावेळी ऍड. एम. जी. पाटील, ऍड. शाम पाटील, ऍड. सुधीर चव्हाण यांनी शेतकऱयांनी कशा प्रकारे लढाई लढली पाहिजे. याचबरोबर कोणकोणती कागदपत्रे जमा केली पाहिजे, ती कागदपत्रे जमा करून म. ए. समितीच्या कार्यालयात द्यावीत, असे सांगितले. प्रथम कायदेशीर सर्व हरकती दाखल करायच्या आहेत. केवळ 21 दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे शेतकऱयांनी अधिक विलंब न करता तातडीने सर्व कागदपत्रे द्यावीत, हरकती दाखल झाल्यानंतर भव्य मोर्चा काढून निवेदन द्यायचे आहे. त्या दृष्टीनेही शेतकऱयांनी आतापासून तयारीला लागावे, असे आवाहन या सर्व वकिलांनी आणि नेते मंडळींनी केले आहे.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर एस. एल. चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्य कमल मंडोळकर, आर. आय. पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱयांनी द्यावयाची कागदपत्रे
हरकती दाखल करण्यासाठी शेतकऱयांनी सातबारा उतारा, शेतीमध्ये घेण्यात येणाऱया पिकाचे प्रमाणपत्र किंवा सध्या असलेल्या पिकाचे छायाचित्र, जमीन मालक नसेल तर त्यांच्या वारसांची नावे, या शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या, जनावरांची संख्या ही सर्व माहिती कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात
लवकरात लवकर आणून देणे गरजेचे आहे.









