The rickshaw was burnt because of the anger of filing a complaint with the police
कलमठ येथील प्रकार ; उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यासह दोघांवर गुन्हा दाखल
पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या भांडणाबाबत पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून सुरज हनुमंत जाधव (३५, कलमठ मठकर कॉम्प्लेक्स) यांच्या रिक्षाला आग लावल्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता रिमेश चव्हाण याच्यासह आप्पा शिर्के ( दोन्ही रा. कलमठ) यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कलमठ येथेच गुरुवारी रात्री १.४५ वा. सुमारास घडल्याचे सुरज यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार, सुरज यांचे आप्पा शिर्के याच्याशी पैशांच्या देवाणघेवाणीवरून भांडण झाले होते. याबाबत सुरज यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार दिली, त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारानंतर रिमेश याने सुरज यांना धमकी दिली होती. तर रात्री सुरज हे राहत्या घरी असताना घराबाहेर आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्यांनी पाहीले असता रिक्षाला आग लागलेली होती. सुरज व अन्य काहींनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत रिक्षा बरीच जळाली व जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
कणकवली : वार्ताहर









