एकदा मृत झालेली व्यक्ती, मग ती कितीही प्रभावशाली असो, पुन्हा जिवंत होत नाही, ही बाब निश्चित आहे. मृत व्यक्तीच्या शरीरात पुन्हा प्राण ओतून तिला जिवंत करेल असे तंत्रज्ञान कधीतरी शोधले जाईल, असे कोणी म्हटल्यास आपल्याला हसावे की रडावे असा प्रश्न पडेल. तथापि, संशोधकांनी तसे प्रयत्न करण्यास बऱ्याच दिवसांपासून प्रारंभ केला आहे. हे प्रयोग यशस्वी झाल्यास मृत व्यक्तींच्या पार्थिव शरीरात पुन्हा चेतना निर्माण होईल आणि या व्यक्ती जिवंत होतील, अशी चर्चा आहे. आजमितीला असे घडणे प्राय: अशक्य असले तरी, भविष्यात असे काही तरी घडू शकेल असा अनेकांचा विश्वास आहे.
याच विश्वासापोटी अमेरिका, युरोपातील प्रबळ देश आणि इतर काही देशांमधील श्रीमंत लोक त्यांचे मृतदेह एका विषेश व्यवस्थेच्या आधीन करीत आहेत. आपला मृत्यू झाल्यानंतर आपले पार्थिव या व्यवस्थेकडे सुपूर्द करण्यात यावे, असे धनवानांनी त्यांच्या इच्छापत्रात लिहून ठेवले आहे. अशा धनिकाचा मृत्यू झाला की त्याची अपत्ये किंवा अन्य परिचित त्याचा मृतदेह या व्यवस्थेकडे देत आहेत. हे मृतदेह विशिष्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रदीर्घ काळपर्यंत जशीच्या तशी ठेवण्यात येत आहेत. जेव्हा केव्हा मृतदेहात प्राण ओतणारे तंत्रज्ञान विकसीत होईल, तेव्हा पुन्हा जिवंत होण्यासाठी आपले शरीरच अस्तित्वात नाही, असे होऊ नये आणि पुन्हा जिवंत होण्याची संधी हुकू नये म्हणून हा सर्व खटाटोप चालला आहे.
त्यामुळे असे गमतीने म्हटले जात आहे, की मृत व्यक्ती जिवंत करणारे तंत्रज्ञान खरोखरच शोधण्यात आले, तर हेच धनिक लोक पुन्हा जिंवत होण्यासाठी एकत्र जमतील आणि या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांचा त्यांच्या आधीच्याच स्वरुपात पुनर्जन्म होईल. अशा प्रकारे पुनर्जन्म झाल्यानंतरही ते धनिकच राहतील आणि त्यांनी कमावलेली मालमत्ता त्यांच्या पुनर्जन्मानतंरही त्यांच्याकडेच असे. अनेक धनिकांनी त्यांच्या इच्छापत्रात तशीही सोय करुन ठेवली आहे.
एकंदर, मृत्यू अटळ असला तरी तो कोणालाच नको असतो. त्यामुळे तो टाळता येऊ शकेल असे, किंवा तो आलाच असेल तर पुनर्जन्म देणारे हे तंत्रज्ञान लवकरात लवकर शोधले जाऊदे, असे निश्चितच प्रत्येकाला वाटते. अर्थातच सध्या हे तंत्रज्ञान हे सत्य नसून केवळ संकल्पना आहे. पण ही संकल्पनाही इतकी मोहक आहे, की ती सत्यात उतरेल या विश्वासावर हे सर्व खटाटोप होत आहेत.









