राजकीय घडामोडींवर नवी दिल्लीत पत्रकारांच्या प्रश्नावर शिवकुमारांची प्रतिक्रिया
बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी चर्चा रंगली असतानाच बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीला प्रस्थान केले होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, हे समजू शकले नाही. मात्र, त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना, राज्यात नोव्हेंबर क्रांती किंवा डिसेंबर क्रांती नाही, जानेवारी, फेब्रुवारीतही होणार नाही. जी क्रांती होईल ती 2028 मध्ये आणि काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, अशी परखड प्रतिक्रिया दिली. नवी दिल्लीत गुरुवारी पत्रकारांनी राज्यात नोव्हेंबर क्रांती आणि 22 व 26 तारखेबद्दल चर्चा होत आहे, अशी विचारणा केली असता डी. के. शिवकुमार म्हणाले, कुणीतरी याविषयी छापले आहे. पक्षाने आम्हाला बिहार विधानसभा निवडणुकीसह अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्या आम्ही पार पाडत आहोत. याशिवाय दुसरी कोणतीही क्रांती होणार नाही.
कोणत्याही नेत्याच्या भेटीचे नियोजन नाही!
दिल्ली दौऱ्यात पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या भेटीचे पूर्वनियोजन नाही. मु कुणाचीही भेट घेणार आही. माझ्याजवळ कोणीही मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी चर्चा केलेली नाही. पक्ष संघटनेच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मतचोरीच्या मुद्द्यावर बुधवारी रात्रीही बैठक झाली आहे, आजही बैठक घेऊन चर्चा केली. मंत्रिमंडळ पुनर्रचना आणि नेतृत्त्व बदलावर काही चर्चा असेल तर ती तुमची (प्रसारमाध्यमांची) आहे. नेतृत्त्व बदलाविषयी मी काही सांगितले आहे का?, मुख्यमंत्र्यांनी काही सांगितले आहे का? पक्ष काय सांगेल तेच ऐकावे लागते, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले. मी पक्षाचा शिस्तबद्ध शिपाई आहे, कधीही पक्षाच्या रेषा ओलांडणार नाही, असेही ते म्हणाले.









