वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
अव्वल भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने गेल्या काही वर्षांपासून तिला त्रास देणाऱ्या अडचणींवर मात करून अखेरीस आगामी हांगझाऊ आशियाई खेळांच्या चाचण्यांसाठी हजेरी लावता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापासून वंचित राहिलेली ही त्रिपुराची जिम्नॅस्ट डोपिंग नियमाच्या उल्लंघनामुळे 21 महिन्यांच्या निलंबनानंतर पुनरागमन करत आहे.
मंगळवारी 29 वर्षीय दीपाने येथील कलिंगा स्टेडियमवर आशियाई खेळांसाठीचा संघ निवडण्यासाठी झालेल्या चाचण्यांदरम्यान अव्वल स्थान मिळवताना कमाल गुणांची कमाई केली. मागील काही वर्षांत मी ज्या त्रासांना सामोरे गेले त्यानंतर मी चाचण्या देऊ शकले याचा मला खूप आनंद होत आहे, असे दीपाने चाचण्यांमध्ये यशस्वीरीत्या भाग घेतल्यानंतर सांगितले. मला वाटते की, हे माझ्यासाठी मोठे पुनरागमन आहे. कामगिरी 100 टक्के नसली, तरी ठीक होती. पण पुढे जाताना मी 100 टक्क्यांहून अधिक देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे ती म्हणाली.
दीपा 2018 च्या जकार्ता आशियाई खेळांसाठीच्या जिम्नॅस्टिक्सच्या तुकडीचा भाग होती. परंतु भरपूर अपेक्षा असूनही तिला तिच्या आवडत्या स्पर्धेमध्ये म्हणजे व्हॉल्टमध्ये पात्रता मिळू शकली नव्हती आणि महिलांच्या बॅलन्स बीममध्ये ती पाचव्या स्थानावर राहिली होती. उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिने महिलांच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीतूनही माघार घेतली होती. त्यानंतर तिच्या पाठीला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती. शिवाय प्रतिबंधित पदार्थासंदर्भातील चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दीपाला 21 महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते, जे यावर्षी 10 जुलैपर्यंत लागू होते.
मी आगरतळा येथे एक ते दीड महिने प्रशिक्षण घेत होते. गेल्या काही वर्षांत मी माझ्या पाठीच्या आणि गुडघ्यांच्या समस्यांवर मात केली आहे. आता जर सर्व काही ठीक झाले, तर मला आशा आहे की, माझी आशियाई खेळांसाठी निवड होईल. मग मी 100 टक्क्यांहून अधिक देण्याचा प्रयत्न करेन, असे ‘प्रोडुनोव्हा व्हॉल्ट’मध्ये निष्णात असलेल्या दीपाने म्हटले आहे. माझ्यावर 2017 आणि 2019 मध्ये दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर कोविड महामारी आली. पण तो सर्व भूतकाळ आहे आणि मला भविष्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे उद्गार तिने काढले.









