‘आय-लीग’मध्ये पाच नवीन संघांना प्रवेश
बेंगळूर :
भारतातील प्रमुख फुटबॉल स्पर्धेचा दर्जा घेऊन फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धा 2023-24 च्या हंगामापासून सहा वर्षांच्या अंतराने परत दाखल होणार असून तसे भारतीय फुटबॉलची शिखर संस्था अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घोषित केले आहे. याशिवाय महासंघाने ‘आय-लीग’मध्ये पाच नवीन संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, स्पर्धेचा विस्तार करून तिचे मजबूत लीगमध्ये रुपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पाच दावेदारांना ‘आय-लीग’मध्ये सामावून घेण्यात आले आहे,
याशिवाय कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे सचिव सत्यनारायण एम यांचा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवीन उपमहासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. ‘एआयएफएफ’च्या ‘व्हिजन 2047’ योजनेच्या अनुषंगाने फेडरेशन चषकसारखी मोठा वारसा लाभलेली स्पर्धा पुनऊज्जीवित करणे हे विवेकपूर्ण ठरेल, अस कार्यकारी समितीचे मत बनले आहे. त्यानुसार, 2023-24 च्या हंगामापासून फेडरेशन कप ही भारतातील ‘प्रीमियर कप’ स्पर्धा असेल, असे महासंघाने म्हटले आहे.
‘आय-लीग’च्या बाबतीत पाच आस्थापनांनी लीगमधील कॉर्पोरेट प्रवेशांसाठी दावे केले होते. त्यात ‘वायएमएस फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड’ (वाराणसी, उत्तर प्रदेश), ‘नामधारी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड’ (भैनी साहिब ग्रमा, पंजाब), ‘निमिडा युनायटेड स्पोर्ट्स डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ (बेंगळूर, कर्नाटक), ‘कॉन्केटनेट अॅडव्हेस्ट
अॅडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड’ (दिल्ली) आणि ‘बंकरहिल प्रायव्हेट लिमिटेड’ (अंबाला, हरियाणा) यांचा समावेश होता. समितीने पाचही दावेदारांना ‘आय-लीग’मध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘एआयएफएफ’चे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी म्हटले आहे की, ज्यांना बऱ्यापैकी मजबूत मानले जाते असे ‘सॅफ’ क्षेत्राबाहेरील दोन संघ ‘सॅफ फुटबॉल स्पर्धे’त असूनही भारताने अंतिम फेरी गाठली. भारताच्या वाढत्या फुटबॉल सामर्थ्याची ही पुरेपूर साक्ष आहे. इंफाळ आणि भुवनेश्वरमध्ये लागोपाठ स्पर्धा जिंकून फिफा क्रमवारीत 100 व्या स्थानावर पोहोचल्यामुळे हे सिद्ध झाले आहे की, भारतीय फुटबॉल योग्य दिशेने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.









