कुडाळ / वार्ताहर.
कुडाळ – मालवण या मुख्य रस्त्या वरील नेरूर जकात नजीकच्या पुलाची संरक्षक भिंत कोसळली .त्यामुळे दोन फूट रस्ता खचला असून वाहतुक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सध्या तेथून एकेरी वाहतूक सुरू आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करावी,अशी मागणी ग्रामपंचायत व वाहनधारकांनी केली आहे. गेली तीन अतिवृष्टी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास नेरूर जकात नाका ते श्री देव नागदा मारुती मंदिरा दरम्यानच्या रस्त्यावरील पुलाची संरक्षक भिंत कोसळली आणि रस्ताही दोन फूट खचला आहे. रस्त्याचा आणखीन भाग खचण्याची शक्यता असून तसे झाल्यास सदर मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अन्य दुर्घटना घडू नये.म्हणून नेरूर ग्रामपंचायत , स्थानिक ग्रामस्थ व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे धोका आहे हे दर्शविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात निशाणा म्हणून दगड ठेवले आहेत.
घटना समजताच नेरूर देऊळवाडा सरपंच भक्ती घाडी, माजी सरपंच शेखर गावडे, माजी उपसरपंच समद मुजावर, रुपेश पावसकर, बाळा पावसकर,अजित मार्गी, राजन पावसकर आदींनी तेथे भेट दिली.मालवण कडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. कुडाळ, सावंतवाडी , वेंगुर्लेदिशेने मालवणकडे ये – जा करण्यासाठी प्रवाशांना हाच मार्ग आहे.पर्यटकांसाठी याच मार्गावरून रेलचेल असते.त्यामुळे वाहनाची मोठी वर्दळ असणारा हा मुख्य रस्ता आहे.
आज पहाटे या रस्त्यावरील पुलाची संरक्षक भिंत कोसळल्याने तेथून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे.बांधकाम विभागाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करावी,अशी मागणी ग्रामपंचायत,ग्रामस्थ व वाहनधारकांमधून होत आहे.दरम्यान,शेखर गावडे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संभाव्य धोकादायक स्थितीकडे लक्ष वेधले असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने केली आहे.









