राज्यातील सत्तासंघर्ष आता निकालाला पोहोचला आहे. काही झाले तरी या पंधरा दिवसात त्याचा निकाल लागणारच आहे. पण, आतापासूनच शिंदेंचे मुख्यमंत्रीपद गेले अशी हवा उठवून भाजपसह विरोधीपक्ष मांडणी करू लागले आहेत. तुरी अजून बाजारातच आहेत…. तरी राजकारणी एकमेकांची टांग खेचताहेत. त्यात अजितदादांचा मुहूर्त कर्नाटकमुळे हुकला म्हणणे म्हणजे शहांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह! हे असं उठवणारे ध्यानात का घेत नसावेत?
सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ नेमके कोणत्या बाजूने निकाल देईल याचा शंभर टक्के खात्रीपूर्वक अंदाज कोणाला लागला आहे का? कोणालाही नाही! कदाचित शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरवले जातील किंवा विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास मोकळीक सुद्धा दिली जाईल किंवा त्याहूनही काही वेगळा आणि मैलाचा दगड ठरेल असा निकाल दिला जाईल.
कदाचित तो एकमताने दिलेला असेल किंवा मूलभूत बाबींवर न्यायाधीशांचे एकमत झालेले नसल्यामुळे तो बहुमताच्या जोरावर निश्चित झालेला सुद्धा असू शकेल. त्याचा अंदाज बांधणे पूर्णत: मुश्किल आहे. सरन्यायाधीशपदावर धनंजय चंद्रचूड हे विराजमान असल्याने काहींच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. ते या प्रकरणात मूलभूत निर्णय देतील असा अनेकांचा विश्वास आहे तर बहुमताच्या जोरावर निकाल विभाजित होईल असाही एक अंदाज आहे.
काहींना कपिल सिब्बल यांचे भावनिक आवाहन महत्त्वाचे वाटते. तर काहींना हरीश साळवे यांनी ऐनवेळी येऊन केलेला युक्तिवाद सरस ठरेल असे वाटते. कायद्याचा ज्याने जसा अर्थ घेतला किंवा ज्याला जी बाजू पटली तो त्या बाजूने भूमिका मांडताना दिसतो आहे. मात्र या सगळ्याच्या पलीकडे न्यायालयीन प्रक्रिया आहे. जिथे निकाल एकमताने किंवा बहुमताने लागेल. तो काय लागेल ते जेव्हा न्यायाधीश जाहीर करतील तेव्हाच समजेल. मात्र या साध्या सरळ बाबीला जनतेसमोर न मांडता राजकारणी आणि माध्यमेसुद्धा आपल्या सोयीची भूमिका मांडून संभ्रमित करत आहेत. काही माध्यमेतर स्वत: न्यायालय असल्यासारखे भासवत आहेत. खटला सुरू होता तोपर्यंत याबाबत उलट सुलट वक्तव्य येणे समजू शकले असते. पण जेव्हा निकाल येणार आहे त्यावेळी जशा पद्धतीचे वातावरण आहे त्यावरून हा निकाल जणू लिहून ठेवला आहे आणि वाचायचे बाकी आहे. वाचन होण्यापूर्वीच काही जणांना त्याचा मसुदा माहीत झाला आहे अशा पद्धतीने त्याचे विश्लेषण केले जात आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे.
न्यायालयाचा निकाल एक स्वतंत्र बाब आहे. तो लागण्यापूर्वी त्याच्यावर लिहावेही लागू नये. मात्र राज्यात इतके अंदाधुंद आणि बेभरवशाचे वातावरण गेल्या दहा महिन्यात झालेले आहे, की त्यामुळे प्रत्येक वक्तव्य ही नवीन नाट्यामय घटना वाटू लागली आहे.
मुख्यमंत्री गावाकडे, तिघांचे साकडे!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती बिघडल्याने विसाव्यासाठी कुटुंबाच्या आग्रहाखातर तीन दिवस सातारा जिह्यातील दरे या आपल्या पूर्वजांच्या गावी येऊन राहिले. प्रत्यक्षात घडलेल्या घडामोडींवर रुसूनच ते येथे आले होते. म्हणजे त्यांच्या आसपास सुद्धा असेच अविश्वासाचे वातावरण तयार झालेले आहे. हे अविश्वासाचे वातावरण विरोधी पक्षांच्या आत्मविश्वास पूर्ण बोलण्यातून नव्हे तर स्वकियांच्या हालचालींमुळेच झाले आहे. हे लपून राहिलेले नाही. नाहीतर फडणवीस शपथ घेणार, अशा चर्चा उठल्या नसत्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करण्यात सगळे काही आले! ज्या पक्षात मोदी आणि अमित शहा यांचे नाव घेतल्याशिवाय एक वाक्य पूर्ण होत नाही, त्या पक्षात परपक्षाच्या एका व्यक्तीला नेता मानण्याची वक्तव्ये मनावर किती मोठे दगड ठेवून केलेली असतील? याचा विचारच केलेला बरा. अमित शहा यांच्या नागपूर दौऱ्यामुळे मुख्यमंत्री बदलाची किंवा त्यांच्या विरोधात निकाल जाण्याची चर्चा थांबेल अशी अपेक्षा होती.
प्रत्यक्षात शहांचा दौरा रद्द झाला आणि मुख्यमंत्र्यांच्या गटाला विनाकारणाचा हादरा बसला. त्यांची हजेरी घ्यायला संजय राऊत हे टपून बसलेले होते. त्यांनी त्यांची गुगली फेकली आणि भलेभले त्यावर पायचित झाले. शहांनी दौरा रद्द करण्यामागे त्यांच्या विरोधी उठलेले खारघर प्रकरण आहे. त्यात पवार-अदानी भेट, पाठोपाठ बारसूवर उठलेला गदारोळ, जनतेचा पाठिंबा आंदोलनाला नाही असे मंत्र्यांचे सांगणे आणि विभागीय आयुक्तांसमोरून लोकांनी उठून जाणे, अजितदादांचे बदललेले स्थानिकांना विश्वासात घ्या हे वक्तव्य म्हणजे सारे गोंधळात भर घालणारेच. या गोंधळातच नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा बोर्ड लागणे, सासरवाडी धाराशिव जिह्यात अजित दादांचा बोर्ड लागणे आणि हा वाद पेटण्यापूर्वी सहजावरी सांगली जिह्यात कसबे डिग्रज मध्ये जयंतराव पाटील मुख्यमंत्री व्हावेत असे बोलून गेलेल्या खा. अमोल कोल्हे यांचे वक्तव्य माध्यमाने उचलून जोरात वाजवणे हे सारेच एका वेळी घडले. पवारांनी भाकरी परतण्याचे अशाच रितीचे इशारे देऊन टाकले. हा गोंधळ लक्षात घेतला तर नेत्यांची जीभ का घसरू लागली आहे? ते लक्षात येईल. प्रकरण त्यांच्या सर्वांच्या हाताबाहेर गेले आहे. राजकारणात काही खेळ होऊ देऊन मजा बघीतली जाते. पण त्यातून असे भलतेच काही घडू लागल्याने भल्याभल्यांचे तोल जाताना दिसत
आहेत.
एका अस्थिरतेतून निर्माण झालेली ही परिस्थिती अजून किती टोकाला पोहोचेल याचा अंदाज राहिलेला नाही. अशातच कोणीतरी अजितदादांचा मुहूर्त कर्नाटक निवडणुकीमुळे हुकला असे म्हणतो तेव्हा हसावे की रडावे समजत नाही. कर्नाटकच्या निवडणुकीवर प्रभाव पडेल असे अजितदादा भाजपला मिळणार असतील तर अमित शहा सहज येऊन ती संधी साधून गेले असते. निकाल लागायची ते वाट कशाला पाहतील? त्यांना आपल्या पक्षाचे हित दिसत नसेल का? पण गोंधळाच्या वातावरणात अशा पुड्या सुद्धा खपून जातात तेही महाराष्ट्रासारख्या राज्यात! हे वेगळेच घडते आहे!!
शिवराज काटकर








