अधिकारी-कर्मचारी सर्वेक्षणात गुंतल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम : नागरिकांची गैरसोय
बेळगाव : सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी यापूर्वी शिक्षकांवर सोपविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने पुन्हा दसरा सुटीत वाढ करून सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले. तरीही सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने आता सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिका कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या कांही दिवसांपासून महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी सर्वेक्षणात गुंतले असल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. सोमवारी महापालिकेतील सर्व विभाग अधिकारी व कर्मचारीविना सुनेसुने पहावयास मिळाले.
शनिवार दि. 25 पासून महापालिका कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर्ससह महापालिकेचे सर्व कर्मचारीही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. यापूर्वी शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम बऱ्यापैकी पूर्ण केले आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले कर्मचारी सकाळी 10 वाजल्यापासून फिल्डवर उतरत आहेत. खरोखरच कर्मचारी सर्वेक्षण व्यवस्थितरित्या करीत आहेत की नाही, याची शहानिशा करण्यासाठी मनपा आयुक्त शुभा बी. स्वत: विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करीत आहेत. चौथ्या शनिवारनिमित्त शासकीय सुटी होती. तरीही मनपा कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेले होते. 31 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे.
मात्र या सर्वेक्षणाचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होताना दिसत आहे. अधिकारी व कर्मचारी नसल्याने विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. कामे करून देण्यास विलंब होत असल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करण्याची वेळ आली आहे. आणखी चार दिवस महापालिकेतील ही परिस्थिती कायम राहणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. सोमवारी नागरिकांनी महापालिकेत विविध कामांसाठी गर्दी केली होती. मात्र अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.









