ओटवणे : प्रतिनिधी
गोपाळ गावकर यांचे आवाहन
मुंबईत राहूनही पारपोली ग्रामस्थांचे पारपोली ग्रामविकास मुंबई मंडळ आपल्या गावाच्या प्रेमापोटी पारपोली गावाच्या शैक्षणिक धार्मिक व सामाजिक कार्यात गेली २५ वर्षे योगदान देत आहे. मंडळाची ही सामाजिक बांधिलकी यापुढेही सुरू राहणार असून पारपोलीवासियानीही संघटीत राहून गावाचा विकास साधावा असे आवाहन पारपोली ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सचिव गोपाळ गावकर यांनी केले.पारपोली ग्रामविकास मंडळाच्या वार्षिक गुणगौरव आणि शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी गोपाळ गावकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पारपोली ग्राम विकास मुंबई मंडळाचे अध्यक्ष गोविंद तेजम, खजिनदार रामचंद्र गावकर, सहसचिव समिर परब, पांडुरंग गावकर, सरपंच लक्ष्मण नाईक उपसरपंच संदेश गुरव, महेश गावकर, हर्ष गावकर, हेमंत परब, वासुदेव परब, सुनिल कलांगण, झिपाजी परब, कृष्णा परब, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पाटील आदी उपस्थित होते.यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोविंद परब यांनी यांनी मंडळाने गावातील आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली असून यापुढेही गावासाठी मंडळाच्यावतीने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही मंडळाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पाटील यांनी मंडळाचे आभार मानले.









