कळंबा / सागर पाटील :
कोल्हापूर शहराच्या उपनगरांमध्ये क्रीडांगण आणि बगीच्यासाठी तब्बल दहा एकरहून अधिक जागा आरक्षित आहे. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या जागांचे हस्तांतरण रखडले आहे. परिणामी, या जागा सांडपाणी, दलदल आणि काटेरी वनस्पतींच्या अधीन झाल्या आहेत. काही बिल्डर्स या आरक्षित जागांचे आरक्षण उठवण्याच्या प्रयत्नात असल्याने उपनगरातील नागरिक, खेळाडूंची चिंता वाढली आहे.
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एकाही क्रीडांगणाच्या निर्मितीसाठी सभागृहात प्रस्ताव सादर झालेला नाही. यामुळे उपनगरातील नवोदित खेळाडूंना सरावासाठी शहरातील मर्यादित क्रीडांगण किंवा रिकाम्या जागांचा आधार घ्यावा लागत आहे.
- उपनगरातील जागांची दूरवस्था
कळंबा परिसरातील बापूराम नगर, जिवबा नाना पार्क, विद्या वसंत पार्क, विनोद चौगुलेनगर, हस्तिनापूर नगरी, जोतिर्लिंग नगर, स्वस्तिक पार्क, महालक्ष्मी पार्क, बुद्धिहाळकर नगर, महाराष्ट्र नगर यासह शंभरहून अधिक कॉलन्यांमध्ये क्रीडांगण आणि बगीच्यासाठी दहा एकरहून अधिक जागा आरक्षित आहेत. मात्र, या जागांवर सुसज्ज क्रीडांगण किंवा बगीचे उभारण्यासाठी कोणताही ठोस प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहात मांडला गेला नाही. परिणामी, या जागांची प्रचंड दूरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी गटारींचे बांधकाम न झाल्याने ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट आहे. यामुळे नागरिकांनी सांडपाणी या खुल्या जागांमध्ये सोडले आहे. त्यामुळे चिखल, दलदल आणि काटेरी वनस्पतींनी या जागा व्यापल्या आहेत. याचा परिणाम म्हणून डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढला असून, उपनगरातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- खेळाडूंची निराशा
उपनगरात अनेक नवोदित खेळाडूंनी फुटबॉल, कुस्ती, क्रिकेट, गोळा फेक, लांब उडी यासह विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सुसज्ज क्रीडांगण आणि बगीच्यांच्या अभावामुळे त्यांना सरावासाठी शहरात जावे लागते. येथील अनेक खेळाडू दीर्घकाळापासून क्रीडा क्षेत्रात सक्रिय असूनही, त्यांना योग्य सुविधा मिळत नाहीत. यामुळे त्यांचा उत्साह आणि प्रगतीवर परिणाम होत आहे. विशेषत? सकाळी पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी पोलीस भरती किंवा आर्मी भरतीच्या तयारीसाठी अनेक खेळाडू कोल्हापूर-गारगोटी या राज्य महामार्गावर सराव करताना दिसतात.
मात्र, या ठिकाणी वाहनांची वर्दळ वाढली असून सराव करताना अपघाताचा धोका यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. राज्य महामार्गावर सरावाचा धोका उपनगरात क्रीडांगण नसल्याने अनेक खेळाडू आणि तरुणांना व्यायाम आणि सरावासाठी कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. संध्याकाळच्या वेळी या मार्गावर खेळाडू धावताना, व्यायाम करताना दिसतात. मात्र, वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यावरील धोक्यांमुळे येथे सराव करणे जोखमीचे ठरत आहे. यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि खेळाडूंनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असून, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
- बिल्डर्सचा डोळा आणि प्रशासनाची उदासीनता
सर्वात गंभीर बाब म्हणजे, या आरक्षित जागांवर काही बिल्डर्सनी डोळा ठेवला आहे. क्रीडांगण आणि बगीच्यासाठी राखीव असलेल्या या जागांचे आरक्षण उठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे उपनगरातील खेळाडू आणि रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या निक्रियतेमुळे या जागांचा विकास रखडला आहे. यामुळे उपनगरातील नागरिक आणि खेळाडूंना क्रीडांगण आणि बगीच्याच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
- जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी
उपनगरातील रहिवाशांनी आणि खेळाडूंनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने या जागांचा विकास करण्याची मागणी केली आहे. सुसज्ज क्रीडांगण आणि बगीचे उभारल्यास स्थानिक खेळाडूंना सरावासाठी योग्य सुविधा मिळतील आणि रहिवाशांना स्वच्छ आणि निरोगी वातावरणाचा लाभ होईल. यासाठी महापालिकेने तातडीने जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून विकासकामांना सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- जागा कायमच्या गमावण्याचा धोका
कोल्हापूर उपनगरातील क्रीडांगण आणि बगीच्यासाठी आरक्षित जागांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन या जागांचा विकास करणे गरजेचे आहे. अन्यथा, उपनगरातील खेळाडू आणि रहिवाशांना आणखी काळ प्रतीक्षा करावी लागेल आणि काटेरी जंगलात रूपांतरित झालेल्या या जागा कायमच्या गमावण्याचा धोका आहे.








