वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हांगझाऊ आशियाई क्रीडा आयोजन समितीने आशियाई खेळांसाठी भारतीय कुस्ती संघाच्या नावाने प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत आणखी वाढवण्याची भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) विनंती नाकारली आहे. ‘आयओए’ने यापूर्वी ‘ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया’ला (ओसीए) भारतीय कुस्तीपटूंच्या नावाने प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची विनंती केली होती, परंतु त्यांना फक्त सात दिवसांची (22 जुलैपर्यंत) मुदतवाढ देण्यात आली होती.
हांगझाऊ आशियाई खेळ आयोजन समितीने आशियाई खेळांत (23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान आयोजन) सहभागी होणाऱ्या सर्व देशांना त्यांच्या खेळाडूंची नावे पाठवण्यासाठी 15 जुलै ही मुदत निश्चित केली आहे. सोमवारी, ‘आयओए’ने ‘ओसीए’ला पुन्हा ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्याबाबत फेरविचार करण्याची विनंती केली असता ती आयोजन समितीने नाकारली आहे. हांगझाऊ आयोजन समितीने ‘आयओए’ची मुदतवाढीची विनंती नाकारली आहे. त्यांनी ते ‘ओसीए’ला कळवले आहे आणि ‘ओसीए’ने हे ‘आयओए’ला सांगितले आहे, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.
भारतीय कुस्ती संघ निवडण्यासाठी आणि आयोजन समितीकडे नावे पाठवण्यासाठी 22 जुलैची अंतिम मुदत वेगाने जवळ येत चालली असल्याने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अस्थायी मंडळाला चाचण्या आयोजित करण्यासाठी आणि सदर प्रतिष्ठित स्पर्धेसाठी संघ निवडण्यासाठी वेळेशी स्पर्धा करावी लागेल.









