रुग्णालयातून डिस्चार्ज ः केरळमधील अन्य दोघांच्या प्रकृतीतही सुधारणा
तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था
मंकीपॉक्सबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील पहिला मंकीपॉक्सबाधित रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची घोषणा केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शनिवारी त्याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. भारतीय आरोग्य यंत्रणेचे हे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, केरळमधील आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्णही मध्य-पूर्वेतून आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण संसर्गमुक्त झाला असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच केस असल्याने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही) सूचनेनुसार 72 तासांच्या अंतराने दोन चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आता सदर रुग्ण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा निरोगी आहे. तसेच त्वचेवरील डाग पूर्णपणे बरे झाले आहेत, असे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.
मूळचा केरळचा 35 वषीय तरुण 12 जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातीतून भारतात आला होता. मायदेशी परतल्यानंतर दोन दिवसांनी 14 जुलैला त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याला लक्षणे दिसू लागल्यावर त्याला कोल्लम येथील रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथून त्याला त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती.
भारतात 27 जुलैपर्यंत मंकीपॉक्सच्या चार रुग्णांची पुष्टी झाली आहे. बाधितांमध्ये केरळमधील तीन आणि दिल्लीतील एकाचा समावेश असल्याचे लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितले होते. सद्यस्थितीत देशात मंकीपॉक्समुळे मृत्यूचे एकही प्रकरण समोर आलेले नाही, असेही सांगण्यात आले. तसेच केंद्र सरकारकडून आरोग्यविषयक जागृतीपर सूचना सर्व राज्यांना वेळोवेळी कळविण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
हिमाचल प्रदेशमध्ये संशयित रुग्ण
हिमाचल प्रदेशातील सोलन जिह्यात शुक्रवारी मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळून आला. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले. बड्डी परिसरात राहणाऱया एका व्यक्तीमध्ये 21 दिवसांपूर्वी संसर्गाची लक्षणे दिसून आली. सध्या तो बरा असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात नजर ठेवली जात आहे.
अवघ्या 16 दिवसात मंकीपॉक्सवर मात
14 जुलै रोजी परदेशातून परतलेल्या केरळमधील कोल्लम येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळून आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता 16 दिवसांनी तो पूर्णपणे निरोगी झाला आहे. आता त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका पूर्णपणे मावळला आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा उष्मायन कालावधी (संसर्गापासून लक्षणे सुरू होण्यापर्यंत) साधारणपणे 6 ते 13 दिवसांचा असतो. काही लोकांमध्ये तो 5 ते 21 दिवसांपर्यंत असू शकतो.









