मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती : काणकोणात झाला जनता दरबार,खाते प्रमुखांनी जनतेला चांगली सेवा द्यावी
काणकोण : सरकारी प्रशासना मध्ये असलेल्या प्रत्येक खाते प्रमुखांनी आपण जनतेचा सेवक असल्याच्या भावनेतून काम करतानाच आपल्या खात्याकडे नागरीकांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत, त्याचा वेळेवर पाठपुरावा केला, त्याच बरोबर ज्या ठिकाणी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले तर अशा प्रकारच्या जनता दरबाराची गरजच नसल्याचे मत काणकोणच्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात आयोजित जनता दरबाराच्या वेळी आपल्या समस्या मांडताना उपस्थित नागरीकांनी व्यक्त केले. जनता दराबारात नागरीकांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत, त्याचा अहवाल आपण मुख्यमंत्री त्याच प्रमाणे संबधित खात्याच्या मंत्र्यांना सादर करणार आहे. ज्या व्यक्तींनी वैयक्तिक समस्या मांडलेल्या आहेत. त्या सर्वांना एका महिन्यांच्या अवधित पुढील कार्यवाहीच्या बाबतीत आपण माहिती पुरविणार असल्याचे मत मत्सोद्योगमंत्री निळकंठ हळर्णकर यांनी यावेळी व्यक्त केले.
काणकोणच्या शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या जनता दरबाराच्या व्यासपीठावर दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई, काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर उपस्थित होते. तर काणकोणचे मामलेदार मनोज गावकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. त्यांना प्रमोद गावकर, गायत्री देसाई, तृप्ती फळदेसाई आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी मिलन देसाई, सुश्मिता लोलयेकर, डायगो डिसिल्वा, मेघनाथ ना. गावकर, शंकर विनायक नाईक, नाटिविदाद डिसा, शांताजी गावकर, संदेश नाईक, प्रसाद वेळीप, खोलचे सरपंच कृष्णा वेळीप, श्रीस्थळचे माजी सरपंच पांडुरंग गावकर, नेल्सन कुतिन्हो, पद्मनाभ नारायण शेणवी, रूद्रेश नमशीकर, रमाकांत प्रभुगावकर, रामकृष्ण नाईक, अनिल ना. गावकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, प्रेमानंद विठोबा बांदेकर, शांबा मुकुंद देसाई, विशाल देसाई, सर्वानंद भगत, दिवाकर पागी, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी विविध समस्या मांडल्या आणि पुढील जनता दरबाराच्या वेळी याची कितपत कार्यवाही झाली आहे त्याचा अहवाल सादर करावा अशी मागणी केली. या जनता दरबारात काणकोणची विस्कटलेली आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पडीक शेती जमीन, जुन्या इमारतींचा प्रश्न, पालिका क्षेत्रातील स्वच्छता, उघड्यावर चालू असलेली मासेविक्री, कित्येक ठिकाणचे रखडलेले रस्ते, करमल घाट आणि अन्यत्र रस्त्यावर वाढलेली झाडे, भटकी जनावरे आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न, नद्यातील साचलेला गाळ उपसणे, ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या, मासळी मार्केट आणि अन्य भागातील अस्वच्छतता, वीज पुरवठा, मच्छिमारी समाजाच्या अशा अनेक समस्या यावेळी नागरीकांनी सादर केल्या.
काणकोण पालिका पर्यटनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र, वाहतूक पोलिस पर्यटकांची विनाकारण तपासणीच्या नावाखाली सतावणूक करतात असा स्पष्ट आरोप नगराध्यक्ष रमाकांत ना गावकर यांनी केला. या तालुक्याला अतिरिक्त अग्निशामक बंब देण्यात यावा, काणकोणच्या सामाजिक आरेंग्य केद्रांत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी, या ठिकाणची ‘क्ष’ किरण सेवा चालू करावी, त्याच प्रमाणे या आरोग्य केंद्राला इस्पितळाचा दर्जा देण्यात यावा, तळपणची जेटी सुधारावी, पडीक शेती लागवडीखाली आणावी, गोवा सरकारच्या कृषी खात्यामध्ये एकसूत्रता आणावी, अशा अनेक गोष्टींसंबधी या दरबारात चर्चा झाली. ‘आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा’ या साठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी विविध योजना समोर आणल्या आहेत. त्यासाठी स्वंर्यपूर्ण मित्र, ग्रामीण मित्र, सागरी मित्र यांची त्यांनी नियुक्त केलेली आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये दर शनिवारी हे अधिकारी उपस्थित राहून लोकांच्या समस्या समजून घेतात. दर महिन्याला त्या त्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक होऊन चर्चा केली जाते. गोव्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर व्हावी यासाठी गोवा सरकारचा प्रयत्न असून संघटितपणे त्यासाठी काम करू या असा सल्ला यावेळी मत्साद्योग मंत्र्यांनी दिला. यावेळी उपस्थित असलेल्या विविध सरकारी खात्यामधील राजेश देसाई, नागेश कोमरपंत, डॉ. जुझे तावारीस, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस, लेस्टर डिसोझा, कल्पना गावकर, मधू नार्वेकर, प्रदीप देसाई, अनिल नाईक, प्रताप ना. गावकर, आणि अन्य अधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. आणि नागरीकांनी सादर केलेल्या समस्यांचे निराकरण केले. काणकोणचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्वाचे स्वागत केले. मामलेदार कार्यालयातील अव्वल कारकून गायत्री देसाई, तृप्ती फळदेसाई यांनी मत्सोद्योग मंत्री आणि इतरांना या ठिकाणी तयार होणाऱ्या फळांची भेट दिली. उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी शेवटी आभार मानले.









