मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : केंद्र सरकारतर्फे गेल्या 10 वर्षात गोव्यात झालेल्या विविध विकासकामांचा अहवाल 6 फेब्रुवारी रोजी मडगावात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत त्यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. विकासाचे भागीदार ठरलेल्या अधिकाऱ्यांचे मोदी यांच्या हस्ते सत्कार होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मोदी यांच्या सभेच्या अनुषंगाने डॉ. सावंत यांनी काल बुधवारी मंत्रालयात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांच्याकडून गेल्या 10 वर्षांतील गोव्यातील विकासकामांचा अहवाल मागवला. बैठकीनंतर डॉ. सावंत यांनी सांगितले की, मोदी यांची मडगावातील सभा हा सरकारी कार्यक्रम आहे. विकसित भारत संकल्प यात्रा 2047 संदर्भात घेतलेले निर्णय यावर मोदी बोलणार आहेत. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात गोव्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला असून त्याचा वापर करून राज्य सरकारने दर्जेदार साधनसुविधा उपलब्ध केल्या आहेत. राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा अहवाल मोदींच्या सभेत ठेवणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. या बैठकीतून मोदींच्या सभेच्या सुरक्षा आढावाही घेण्यात आला.
राष्ट्रीय उर्जा सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
बेतुल येथे 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय उर्जा सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन प्रथम मोदी करणार आहेत. त्यानंतर त्यांची मडगावात जाहीर सभा होणार आहे. सभेची प्रदेश भाजपकडून मोठी जय्यत तयारी सुरु असून राज्यातून 50,000 पेक्षा जास्त लोकांची हजेरी सभेसाठी लाभावी म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मोदींची सभा म्हणजे गोव्यातील लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार आहे.